शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

! विनोदी अभिनेते शरद तळवलकर जन्मदिन !! (१नोव्हेंबर )

 !! विनोदी अभिनेते शरद तळवलकर जन्मदिन !! (१नोव्हेंबर )

   शरद तळवलकर जन्म:१ नोव्हेंबर १९१८ मृत्यू: २१ ऑगस्ट २००१ हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते. चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे कै शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु :खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत. शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शरद तळवलकरांचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस ‘रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपाल आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
               कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या ‘नाट्यविकास’ मंडळीत त्यांनी नोकरी केली. ‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी ‘मिलिटरी अकाउंट्‌स’ मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते.
            विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘माझा मुलगा’ तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर ‘एकच प्याला’तील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली.
               मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका वास्तवाशी निगडित असून खूपच सुंदर होती अतिशय बोलक्या चेहऱ्याच्या ह्या विनोदी कलावंताला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणाऱ्या ‘विष्णुदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले.स्व. शरद तळवलकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक:  राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

!! सरदार वल्लभभाई पटेल जन्मदिन तथा राष्ट्रीय एकता दिवस !! (३१ ऑक्टोबर )




 

!! सरदार वल्लभभाई पटेल जन्मदिन
तथा राष्ट्रीय एकता दिवस !!
    (३१ ऑक्टोबर )



    सरदार वल्लभभाई पटेल जन्म:३१ ऑक्टोबर १८७५ मृत्यू:१५ डिसेंबर १९५०
      ३१ ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस असून तो राष्ट्रीय एकता दिवस म्हणून २०१४ पासून साजरा केला जातो. जगाचा विचार करता भारत हा लोकसंख्येने  दोन नंबरचा देश आहे. आपल्या देशात १६०० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात.हिंदू, शीख,बौद्ध, जैन, इस्लाम तसेच पारशी धर्माचे लोक असून,त्यांची भाषा वेगळी, प्रांत वेगळे, वेशभूषा वेगळी, रीतिरिवाज वेगळे असणारा असा देश आहे.
        राष्ट्रात एकता असेल तरच तो देश मजबूत होतो,देशात शांतता प्रस्थापित होते, देश समृध्द होतो. देशाला एकजूट करण्याचे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांनाच जाते. आपल्या देशात एकता नसल्याने इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले.आपल्या देशात ५६५ संस्थाने होती त्यांचे एकीकरण पटेल यांनी केले त्यामुळे त्यांना पोलादी पुरुष असे म्हटले जाते.
      भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात वल्लभभाई पटेल यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. ते महात्मा गांधीजींचे अनुयायी होते. बारडोलीच्या सत्याग्रहात जनतेने त्यांना सरदार ही पदवी बहाल केली. ते भारताचे  उपपंतप्रधान तसेच गृहमंत्री होते.
         नर्मदा नदीच्या काठावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा त्यांच्या विशालतेचे महत्व पटवून देतो. आजच्या दिवशी मरेथॉनचेही आयोजन केले जाते. ह्या रनला "Run For Unity"असे म्हटले जाते.सरदार पटेल यांना भारत सरकारने १९९१ला "भारतरत्न" हा सर्वोच्च 'किताब मरणोत्तर दिला. या दिवसाच्या निमित्ताने देशात ऐक्य कसे वाढेल यासाठी सर्वजणच प्रयत्न करुया, सरदार पटेल यांना  जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.   
      संकलक : राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

!! जागतिक काटकसर (बचत ) दिन !! (३० ऑक्टोबर )


!! जागतिक काटकसर (बचत ) दिन !!

   (३० ऑक्टोबर )
               मानवी स्वभाव म्हणजे हातात पैसा आला की, तो खर्च झालाच म्हणून समजा. गरजेपेक्षा हौस महत्त्वाची ठरत असली, तरी भविष्याचे नियोजनही तेवढेच महत्त्वाचे ठरते. गरजेला महत्त्व देतानाही काटकसर करण्याकडे मात्र दुर्लक्ष नकोच नको. अनेकजण काटकसरीला कदाचित "कंजूषपणा' असे बिरूद लावतील; पण हा "कंजूषपणा' म्हणजे खर्चाला "काट' देत केलेली एकप्रकारची कमाईच आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, " Save money is  earn money" काटकसरीची कसरत स्वयंपाकघरापासून करत वीज आणि इंधन बचतीची प्रवृत्ती विकासाकडे घेऊन जाणारी आहे. अर्थात्‌ काटकसरीचा गुण महिलांमध्ये जन्मजातच असतो. म्हणून "किचन किंग' म्हणून महिलांची ओळख आजही कायम आहे. 

                  देशाच्या प्रगतीत नागरिकांचेही सक्षमीकरण लपले आहे. हाच धागा पकडून इटलीमध्ये ३० ऑक्‍टोबर १९२४ रोजी आंतरराष्ट्रीय बचत बॅंकेची स्थापना करण्यात आली. कार्यक्रम सुरू असताना एका इटालियन प्रोफेसरकडून कार्यक्रमाच्या शेवटी "आंतरराष्ट्रीय बचत दिन' घोषित केला. तेव्हापासून जागतिक बचत दिन अर्थात्‌ काटकसर दिन पाळला जातो. काटकसरीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्याला मदत मिळते, हा मुख्य हेतू यामागे होता.
                     खर्चाचे नियोजन न करता मनमौजीपणे पैसा उधळल्यास हातात "शून्य' उरते. बचतीऐवजी उसणवारीवर जगण्याची वेळ येते. यातूनच सावकारी पद्धत पुढे येते. केवळ पैशाचीच नव्हे, तर वीज, पाणी, इंधन बचत करून काटकसर दिन साजरा करावा. बचतगटांची क्रांती काटकसर दिनाचे प्रतीक अलीकडे खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्यात. आकर्षक राहणीमान तसेच मॉलसंस्कृती आल्यापासून खरेदीला उधाण आले. जी वस्तू बाहेर दोनशे रुपयाला मिळते, ती वस्तू तिथे चारशे रुपयाला मिळते. मग काटकसर कशी होईल. जिथे दोन पैसे वाचावे असे वाटते, तिथे अधिकचे पैसे खर्च होतात. अशावेळी बचतगटासारखे पर्याय पुढे आले आहेत. हे बचतगटही महिलांनीच तयार केले आहेत.
            कशी करावी बचत 
१)वेतनातील पाच टक्के रक्कम बॅंकेत जमा करावी.
२)बचतगट, पोस्टात आवर्त ठेव गुंतवणूक करावी.
३)सौरऊर्जेतून आणि कामापुरताच वीज वापर करावा. 
४)कमी अंतरासाठी सायकलचा वापर करावा .
५)भूखंड, सोने खरेदीतून बचत करावी. 
          काय करू नये  
१)विनाकारण परदेश प्रवास टाळावा.  
२)छोट्या-छोट्या कारणासाठी मोटार काढू नये.  
३)वाहनाचा वेग नियंत्रित केल्यास इंधनाची बचत होते.  
४)उगाच विद्युत उपकरणे सुरू ठेवू नये.
          राजेंद्र पवार
   ९८५०७८११७८             

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

!! रोगनिदानशास्त्रज्ञ वसंत रामजी खानोलकर स्मृतिदिन !!(२९ ऑक्टोबर )

!! रोगनिदानशास्त्रज्ञ वसंत रामजी
  खानोलकर स्मृतिदिन !!(२९ ऑक्टोबर )




        डॉ.वसंत रामजी  खानोलकर जन्म : १३ एप्रिल १८९५ मृत्यू: २९ ऑक्टोबर १९७८ वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म कोकणातील एका छोट्या खेडेगावात एका  गोमंतक मराठा समाजातील सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामजी धोंडो खानोलकर एक प्रतिष्ठित शल्यचिकित्सक होते. कंदाहारला गेलेल्या लॉर्ड रॉबर्टच्या विजयी सैन्यासोबत परतताना क्वेट्टा येथे ते विश्रांतीसाठी थांबले. तेव्हा क्वेट्टाचे वातावरण आणि परिसर रामजींना एवढे आवडले की त्यांनी तेथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने १९३५च्या भयानक भूकंपात रामजी आणि त्यांच्या परिवारातील १४ जण मृत्युमुखी पडले. रामजींचा वैद्यकीय वृत्तीसोबतच संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास होता. त्यांच्याकडे अनेक मूल्यवान आणि दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह होता. बहुधा वसंत खानोलकरांना वैद्यक आणि भाषा या विषयांची आवड वडिलांकडूनच मिळाली असावी.
        वसंत खानोलकरांनी लहानपणीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथेच ते सी. जी. पंडित यांना पहिल्यांदा भेटले. त्याच वर्षी ते इंग्लंडला रवाना झाले. लंडन विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी संपादन केली आणि १९१८मध्ये वैद्यकीय पदवी मिळवली. १९२३ मध्ये ते रोगनिदानशास्त्रात (पॅथॉलॉजी) एम.डी. झाले. या काळात त्यांनी मूलभूत विज्ञान आणि वैद्यकीय संशोधनात अमूल्य अनुभव मिळवला. ते सर्वात कमी वयाचे ग्रॅहम रिसर्च स्कॉलर होते. भारतात परत येऊन ते ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रोगनिदानशास्त्र शिकवू लागले. शिक्षणासाठी उपयुक्त विविध नमुन्यांचे संग्रहालय त्यांनी सुरू केले.
            रोगनिदानशास्त्राच्या पद्धतशीर शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. रोगनिदानशास्त्रातील संशोधनावरही त्यांनी विशेष भर दिला. पाश्चात्य देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत भारतीय शिक्षण कमी पडू नये म्हणून त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात अनेक बदल सुचवले. वैद्यकीय शिक्षणामध्ये मूलभूत विज्ञान, प्रायोगिक जीवशास्त्र (एक्सपेरिमेंटल बायोलॉजी), जीवरसायनशास्त्र, जीवभौतिकशास्त्र तसेच संख्याशास्त्र यांचे महत्त्वाचे स्थान त्यांनी ओळखले होते. हे तत्त्वज्ञान त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये पसरविण्याचा प्रयत्न केला. खानोलकरांनी रोगनिदानशास्त्राचे शिक्षक या नात्याने या विषयाच्या अभ्यासाला त्यांनी नवीन दिशा दिली. खानोलकरांनी सेठ जी. एस. मेडिकल महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयात कामाच्या एका वेगळ्या परंपरेची सुरुवात केली. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर एक अत्युत्तम वैद्यकीय संस्था असण्याचा मान मिळाला. जैवभौतिकी, उपयोजित जीवशास्त्र इत्यादी विषयांची सुरुवात त्यांनी मुंबई विद्यपीठात केली. या कालावधीत खानोलकरांना कर्करोग आणि कुष्ठरोग यांच्या अभ्यासामध्ये विशेष कुतूहल व आवड निर्माण झाली. तेव्हा त्यांनी शिक्षकी पेशातून अंग काढून घेतले आणि टाटा मेमोरियल रुग्णालयात प्रमुख रोगनिदानतज्ञ म्हणून १९४१ मध्ये ते रुजू झाले. त्यांनी कर्करोग, कुष्ठरोग, पुनरुत्पादनाचे शरीरशास्त्र, मानवी अनुवंशशास्त्र या विषयात संशोधन केले.
           खानोलकर १९४१-१९५१ या काळात टाटा मेमोरियल रुग्णालयात अर्बुदाच्या (ट्युमर)  तपासणीच्या कामात व्यस्त राहिले. त्यांच्या संशोधनाचा विषय भारतातील कर्करोग हा होता. भारतात कर्करोग आहे का, त्याचे कोणते प्रमुख प्रकार आहेत, हे शोधण्यासाठी त्यांनी रुग्णालयातील आकडेवारीचा अभ्यास केला. कर्करोगासाठी कारणीभूत काही घटक/सवयी, रोगपरिस्थितीविज्ञान (एपिडेमियॉलॉजी) यांचा त्यांनी अभ्यास केला. या संदर्भातील त्यांचे शोधनिबंध अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले. भारतातील कर्करोगासंदर्भातील त्यांच्या अग्रगण्य कामाबद्दल त्यांना १९४७मध्ये आंतरराष्ट्रीय कर्करोग युनियनचे (इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट  कॅन्सर) सदस्यत्व बहाल करण्यात आले.
       कर्करोगावर संशोधन करण्यासाठी भारतामध्ये तंत्रज्ञान आणि साधनसामग्री उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या मागणीचे मूल्यमापन एका खास सरकारी समितीने केले. या कामासाठी अमेरिकेहून इ. व्ही. कॉद्रे यांनाही बोलावण्यात आले होते. सर्वानुमते खानोलकरांना संशोधनासाठी एक राष्ट्रीय प्रयोगशाळा देण्यात यावी असे ठरले. अखेर १९५२ मध्ये इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर (आय. सी.आर.सी.) सुरू करण्यात आले. यासाठी अनेक जागतिक संस्थांचे आर्थिक पाठबळ मिळाले, त्यात रॉकफेलर फाउंडेशन, जागतिक आरोग्य संघटना होत्या.
        कर्करोगाव्यतिरिक्त खानोलकरांनी कुष्ठरोगावरही संशोधन केले. पुनरुत्पादनाचे शरीरशास्त्र यावर कार्य करण्यामध्ये खानोलकरांचा भर होता. या त्यांच्या उपक्रमातूनच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कुटुंबनियोजनाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. खानोलकर ७ वर्षे या समितीचे अध्यक्ष होते. इंडियन ॲसोशिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायॉलॉजिस्ट या संघटनेची स्थापना त्यांनी केली. भारतात वैद्यकीय संशोधन सुरू करण्याचे श्रेय खानोलकर व त्यांचे जवळचे मित्र सी. जी. पंडित आणि बी. बी. दीक्षित यांना जाते. खानोलकर अनेक भाषा पारंगत होते. ६ भारतीय आणि ४ यूरोपियन भाषा ते बोलू आणि वाचू शकत होते.
          भारत सरकारने खानोलकरांना पद्मभूषण देऊन गौरविले. ते इंडियन ॲसोसिएशन ऑफ पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, इंटरनॅशनल कॅन्सर रिसर्च कमिशनचे अध्यक्ष, इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरचे निदेशक, कर्करोग आणि कुष्ठरोगावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीचे सदस्य आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसने खानोलकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वक्तृत्व स्पर्धा सुरू केली.
        कर्करोग आणि कुष्ठरोग यावर त्यांनी तीन पुस्तके  आणि  शंभरहून जास्त शोधनिबंध  प्रकाशित केले आहेत.
            खानोलाकारांचा मृत्यू मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात झाला.स्मृतिदिनाच्या निमित्ताने डॉ. खानोलकर यांना विनम्र अभिवादन.
     माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
   संकलक :राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८


मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

!! भगिनी निवेदिता जन्मदिन !! (२८ ऑक्टोबर )

 

!! भगिनी निवेदिता जन्मदिन !!
   (२८ ऑक्टोबर )




       भगिनी निवेदिता जन्म:२८ऑक्टोबर १८६७ मृत्यू:१३ ऑक्टोबर १९११
  भगिनी निवेदिता यांचे  मूळ नाव 'मार्गारेट एलिझाबेथ नोबुल' असे होते. त्या एक इंग्रजी-आयरिश सामाजिक कार्यकर्त्या लेखक, शिक्षक आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या.
            भारतीयांना भगिनी निवेदिता यांच्याबद्दल खूप अभिमान आहे. परदेशी असूनदेखील त्यांनी भारतवासीयांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी धडपडणाऱ्या लोकांना भगिनी निवेदिता यांनी उघडपणे मदत केली. त्या स्वतः१९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या
अधिवेशनाला उपस्थित होत्या. भगिनी निवेदिता यांच्या घरी रवींद्रनाथ टागोर, गोपाळ कृष्ण गोखले, अरविंद घोष, जगदीशचंद्र  बोस आदींची ये-जा असे. त्याचबरोबर कलाकार ,बुद्धीजीवी लोक यांचीही ऊठबस असे.
               त्याकाळात बालविवाह प्रथा होती,स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते. स्त्रियांची स्थिती केवळ शिक्षणानेच बदलू शकते म्हणून महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी "निवेदिता बालिका विद्यालयाची" स्थापना केली.या शाळेचे उदघाटन रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदादेवी यांच्या हस्ते झाले. शारदादेवी भगिनी निवेदिताना आपली मुलगी मानत आणि ते नाते त्यांनी शेवटपर्यंत टिकवले. त्यावेळी आपल्या देशावर ब्रिटिशांचे राज्य असल्याने शाळांमध्ये" वंदे मातरम" म्हणण्यास परवानगी नव्हती अशी बंदी असताना देखील त्यांनी ही प्रथा आपल्या शाळेत चालू ठेवली.  त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी बंगाल स्कूल ऑफ आर्टची देखील स्थापना केली, हिंदू मुस्लिम ऐक्यासाठीही प्रयत्न केला.
                 भारतात येण्यापूर्वी त्यांनी  शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती. वयाच्या पंचविसाव्या वर्षीच विम्बल्डनमध्ये "रस्किन स्कूल" नावाची शाळा स्थापन केली होती. विवेकानंद इंग्लंडला गेले असताना , भगिनी निवेदिता यांनी गरीब, गरजूना मदत करण्याचे विवेकानंदाचे आवाहन ऐकले,ते त्यांना खूप भावले.त्यामुळे त्या प्रभावित होऊन  पुढील कार्यासाठी वयाच्या ३०व्या वर्षीच भारतात आल्या.
           स्वामी विवेकानंद यांनी मार्गारेट नोबल यांचे २५ मार्च १८९८ रोजी"भगिनी निवेदिता"असे नामकरण केले.भारतात १८९९ मध्ये प्लेगची साथ आली असताना स्वतःचा जीव धोक्यात घालुन भगिनी निवेदिता यांनी कोलकाता येथे रुग्णांची सेवा केली.मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे हे आपल्या कृतीतून त्यांनी पटवून दिले.
     भगिनी निवेदिता यांचा मृत्यू  वयाच्या ४४व्या वर्षी १३ ऑक्टोबर १९११रोजी प.बंगाल येथे झाला.आपले संपूर्ण जीवन भारतासाठी समर्पित करणाऱ्या भगिनी निवेदिता यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक : राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८


रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

!! कविवर्य भा. रा. तांबे जन्मदिन !! (२७ ऑक्टोबर )

 

!! कविवर्य भा. रा. तांबे जन्मदिन !!
   (२७ ऑक्टोबर )




                भास्कर रामचंद्र तांबे जन्म:२७ऑक्टोबर १८७३ मृत्यू: ७ डिसेंबर  १९४१ अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी होत. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
              तांबे  यांनी बालगीते,नाट्य गीतेही लिहिली आहेत.त्यांच्या बहुतांश कविता प्रेमसंबंधीच्या असून त्यामध्ये निसर्गावरील प्रेमही व्यक्त केलेले दिसून येते. त्यांच्या कवितांतून महिलांविषयी विशेषतः बालविधवाबद्दल  अधिक सहानुभूती दिसून येते. त्याकाळी बाल-जरठ विवाह होत असत त्यामुळे अनेक मुलींना लवकरच विधवा व्हावे लागे आणि आपल्या जोडीदाराशिवाय संपूर्ण जीवन व्यथित करावे लागे,त्याचे वर्णनही कवितातून दिसून येते.
         तांबे यांच्या काही प्रसिद्ध कविता
१)अजुनि लागलेचि दार
२)कशी काळ नागिणी
३)कळा ज्या लागल्या जीवा
४)कुणि कोडे माझे उकलिल का
५)घट तिचा रिकामा
६)घन तमीं शुक्र बघ
७)चरणि तुझिया मज देई
८)जन पळभर म्हणतील हाय हाय
९)डोळे हे जुलमि गडे
१०)तिनी सांजा सखे मिळाल्या
११)तुझ्या गळा माझ्या गळा
१२)नववधू प्रिया मी बावरतें
१३)निजल्या तान्ह्यावरी माउली
१४)पिवळे तांबुस ऊन कोवळे
१५)भाग्य उजळले तुझे
१६)मधु मागशी माझ्या
१७)मावळत्या दिनकरा
१८)या बाळांनो या रे या
           भा. रा.तांबे यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
भा. रा.तांबे यांची कविता ऐकण्यासाठी यु ट्यूबची लिंक देत आहे. आपण कवितेचा आस्वाद घ्या.
https://youtu.be/Qvsg5htk9_c
    संकलक :राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

!!पंडित हृदयनाथ मंगेशकर जन्मदिन !! (२६ ऑक्टोबर )

 


!!पंडित हृदयनाथ मंगेशकर जन्मदिन !!

    (२६ ऑक्टोबर )





पंडित हृदयनाथ मंगेशकर जन्म :२६ ऑक्टोबर १९३७ हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक आहेत. ते प्रख्यात संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांचे चिरंजीव असून  भारतीय संगीत दिग्गज लता मंगेशकर , आशा भोसले ,उषा मंगेशकर, मीना खाडीकर यांचे छोटे बंधू आहेत .  संगीत आणि चित्रपट उद्योगात ते बाळासाहेब म्हणून लोकप्रिय आहेत .
             हृदयनाथ यांनी १९५५ मध्ये आकाशगंगा या मराठी चित्रपटाद्वारे संगीत कारकीर्दीची सुरुवात केली . तेव्हापासून,त्यांनी अशा विविध मराठी चित्रपटांना संगीतबद्ध केले त्यापैकी संसार , चानी , हा खेळ सावल्यांचा, जानकी ,जैत रे जैत , उंबरठा आणि निवडुंग हे होत. त्यांनी ‘ दूरवंती’ या दूरदर्शनच्या संगीत नाटकात संगीत दिले .
        हृदयनाथ मंगेशकर यांना विविध पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे.
१) लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोत्तम गायक पुरस्कार.
२)महाराष्ट्रातील लोकांनी पंडित ही पदवी दिली. भीमसेन जोशी व पंडित जसराज यांच्या हस्ते प्रदान.
३)पद्मश्री पुरस्कार (२००९ )
४)३८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
      पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
    संकलक:राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८



शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

!! दसरा --विजयादशमी !!

 


            !!  दसरा --विजयादशमी !!





             “दसरा सण मोठा – नाही आनंदाला तोटा”
नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो. खंडे नवमीला देव उठतात आणि मग दारी येतो तो दसरा.
“ दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा ” असं जे म्हटलं जात ते काही उगाच नाही. देवीन महिषासुराशी युद्ध करून त्याला मारला तोच हा दिवस. प्रभू रामरायांनी रावणाचा वध केला तो हा दिवस. रजपूत काय किंवा मराठे वीर काय ह्यांनी युद्ध मोहिमांना प्रारंभ केला तोच हा दिवस.
          दसऱ्याच दुसरं नांव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस.
              दसरा ह्या सणांच मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्य योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तक प्रकाशीत केली होतात.
                 ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी.
             आपट्याच्या पानाला सोन्याच मोल कां आणि कसं आल ह्याबद्दल जी एक कथा सांगितली जाते, ती अशी की –
फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता.
एकदा काय झालं. गुरू वरतंतू ह्याचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले – गुरूजी! तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. शहाणे केल. त्या बदल्यांत आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरु वरतंतू म्हणाले, “ बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा बरं!”
              पण कौत्स मात्र ऐकेनाच, सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला मग गुरु म्हणाले, “ मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.” कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षांत ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली.पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौत्साला तू तीन दिवसांनी ये असं सांगितलं.
          रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना, मग रघुराजाने युध्दाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली. दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः तो मुद्रांचा ढीग पाहिला. दारी आलेल्या कौत्साला हवं तेवढं धन घे म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणेपुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता.
                  त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात-घेतात. ह्या दिवशी शस्त्र पूजा सुद्धा करतात. पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. पराक्रमाचा आनंद देण्या-घेण्याचा परस्परांत प्रेम वाढवण्याचा हा एक दिवस सुंदर सण-दसरा.
विजयादशमीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
           संकलक - राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८
            

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

! पंडित दत्तात्रय विष्णू पलुसकर स्मृतिदिन !! (२५ ऑक्टोबर )

!! पंडित दत्तात्रय विष्णू पलुसकर स्मृतिदिन !! (२५ ऑक्टोबर )

 


 


 


              पंडित दत्तात्रय विष्णू पलुसकर जन्म:१८ मे १९२१ मृत्यू: २५ ऑक्टोबर १९५५ हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या आईचे नाव रमाबाई, आणि पत्‍नीचे उषाताई. विनायकराव पटवर्धन हे पलुस्करांचे गायनगुरू होत.
           हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. वयाच्या चौदाव्या वर्षी द.वि. पलुस्कर यांचे गाणे जालंधरला झाले होते. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती.
           पंडित दत्तात्रय पलुस्कर यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८


गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

!! संयुक्त राष्ट्रसंघटना स्थापना (१९४५ )!! (२४ ऑक्टोबर )

!    संयुक्त राष्ट्रसंघटना स्थापना
       (१९४५ )!! (२४ ऑक्टोबर )

                        संयुक्त राष्ट्रसंघटना  ही आंतरराष्ट्रीय कायदा, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवी हक्क आणि जागतिक शांतता सुलभ करण्यासाठी  स्थापन झालेली संस्था आहे.संयुक्त राष्ट्रसंघटनेची  स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ रोजी झाली.
          द्वितीय विश्वयुद्धातील विजयी देशांनी आंतरराष्ट्रीय संघर्षात हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना केली. त्यांना अशी इच्छा होती की भविष्यात दुसरे महायुद्धासारखे युद्ध पुन्हा उदयास येणार नाही. सर्वात शक्तिशाली देश ( युनायटेड स्टेट्स , फ्रान्स , रशिया आणि युनायटेड किंगडम ) संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या  संरचनेत  दुसर्‍या महायुद्धातील सर्वच महत्वाचे देश होते.
       सध्या संयुक्त राष्ट्रसंघटनेत जगातील बहुसंख्य राष्ट्रे सदस्य आहेत. संघटनेचे सभासदत्व ऐच्छिक आहे. या संघटनेच्या  रचनेत महासभा , सुरक्षा परिषद , आर्थिक व सामाजिक परिषद , सचिवालय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय यांचा समावेश आहे .संयुक्त राष्ट्रसंघटनेचे प्रमुख कार्यालय न्यूयार्क राज्यातील मॅनहॅटन बेटावर स्थापन करण्यात आले आहे.हा अमेरिकेचा प्रदेश असला तरी नियंत्रण मात्र संयुक्त राष्ट्रसंघटनेचे आहे. या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या काही घटकांचे काम जिनिव्हा, पॅरिस अशा शहरातून चालते.
           राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

!! पंडित राम मराठे जन्मदिन !! (२३ ऑक्टोबर )


!!  पंडित राम मराठे जन्मदिन !!
    (२३ ऑक्टोबर )



 


             राम पुरुषोत्तम मराठे जन्म : २३ ऑक्टोबर १९२४  मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८९  हे प्रसिद्ध मराठी ख्यालगायक, गायक ,नट व संगीतदिग्दर्शक होते. त्यांचा जन्म पुणे येथे पुरुषोत्तम व मथुराबाई या दांपत्यापोटी झाला.  त्यांच्या वडिलांची पुणे येथे खानावळ होती. लहानपणीच त्यांची संगीताची ओढ वडिलांनी लक्षात घेतली. वडील व काका गजानन यांच्याकडून रामभाऊंवर गाण्याचे व अभिनयाचे संस्कार झाले. त्यांचे शालेय शिक्षण भावे स्कूलमध्ये झाले. सुरुवातीस त्यांनी मुळे यांच्याकडे गाण्याचे व अंबीटकर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतले. त्यांची मोठी बहीण गोदावरी ही गोपाळ गायन समाज येथे शास्त्रीय संगीत शिकायला  जात असे. तिच्याबरोबर ठेका धरण्यास ते जात. त्या काळातील गाजलेल्या ध्वनिमुद्रिकांचे श्रवण करून त्यांचे हुबेहूब अनुकरण ते करत व लहानमोठ्या कार्यक्रमात आपली कला सादर करत.
             १९३५ मध्ये मराठे यांना ‘सागर फिल्म’ या संस्थेच्या धरम की देवी या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका मिळाली. येथून त्यांचे चित्रपटातील अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर १९४० मध्ये ‘मेहबूब फिल्म’ या चित्रपटनिर्मिती संस्थेच्या  १९३६ मध्ये मनमोहन , १९३७ मध्ये जागीरदार   आणि १९३८ मध्ये  वतन   या चित्रपटांत त्यांनी काम केले. तसेच न्यू थिएटरच्या लाईफ इज अ स्टेज या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले. याशिवाय जयंत पिक्चर्स, इम्पिरिअल फिल्म आदी चित्रपटसंस्थाच्या चित्रपटातही त्यांनी विविध भूमिका केल्या. प्रभात फिल्मच्या माणूस, गोपाळकृष्ण  या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या; पण त्यांची ओढ अभिजात शास्त्रीय संगीताकडे होती. त्यामुळे त्यांनी मास्तर कृष्णराव यांच्याकडून १९४१ मध्ये शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. पुढे त्यांना १९४० ते १९४२ मध्ये पं. वामनराव सडोलीकर , १९४७ ते १९५० मध्ये पं. मनोहर बर्वे, पं. यशवंतराव मिराशीबुवा , १९५२ ते१९६८ मध्ये जगन्नाथबुवा पुरोहित , उ. विलायत हुसेनखाँ तसेच बी. आर. देवधर यांची तालीम व मार्गदर्शन मिळाले.
                 शास्त्रीय संगीत आत्मसात केल्यानंतर रामभाऊंनी ग्वाल्हेर, जालंदर, पाटणा, कोलकाता, दिल्ली व अमृतसर येथील शास्त्रीय संगीत संमेलनामध्ये भाग घेतला. नटवर्य गणपतराव बोडस यांच्या आग्रहास्तव त्यांनीसंगीत सौभद्र  या नाटकातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे १९५० मध्ये संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, केशवराव दाते, विनायकबुवा पटवर्धन, जयमाला शिलेदार, नानासाहेब फाटक इत्यादींबरोबर त्यांनी एकच प्याला, संशयकल्लोळ, स्वयंवर, मंदारमाला, सौभद्र, जय जय गौरीशंकर  इत्यादी नाटकांत भूमिका केल्या. तसेच काही नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले आणि अहिरभैरव, बैरागी, जोगकंस, अभोगी, बागेश्री कंस, बसंतबहार इ. रागांचा कौशल्यपूर्ण प्रयोग त्यांनी केला.
            राम मराठे यांच्या गाण्याची पट्टी चढी पांढरी चार अशी होती. प्रथम नोम्-तोम् आलापांनी सुरुवात करून बंदिशीच्या अंगानी हुकमी सूर लावून ते रागाची बढत करत. बंदिशीतील बुद्धिनिष्ठ व शिस्तबद्ध मांडणीत गायकीतील विविध अलंकारांचा वापर ते करीत. त्यांना शेकडो बंदिशी मुखोद्गत होत्या.  ते स्वत: तबलावादक असल्यामुळे त्यांचे लयतालावर प्रभुत्व होते. विलंबित एकताल, तीनताल, तिलवाडा, झूमरा, आडाचौताल, मध्यलयीतील रूपक, झपताल अशा विविध तालातील चिजा त्यांना अवगत होत्या. तसेच विविध तनकारीच्या प्रकारांचा संग्रह त्यांच्याकडे होता.  खुला दमदार आवाज, तानेतील स्पष्टता, दाणेदारपणा व समेवर हमखास येण्याचे कौशल्य ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये. अनवट व जोड रागांवर त्यांचे प्रभुत्व होते. बसंत बहार, नट केदार, बसंती केदार, जौनकली, भैरव बहार, भैरव भटियार, जौन भैरव आदी अनेक जोड व अनवट राग गाण्यात त्यांचा हातखंडा होता.
         राम मराठे यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध आहेत. एच.एम.व्ही. (हीज मास्टर्स व्हॉईस) कंपनीने त्यांनी गायलेल्या देस, अडाणा, भीमपलास आणि सूरमल्हार या रागांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत. संगीतकार स्नेहल भाटकर यांचे संगीत असलेली त्यांच्या भावगीत गायनाची ध्वनीमुद्रिका काढण्यात आली . बालगंधर्व गायकीचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या काही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत . त्यांत देवा धरिले चरण, नुरले मानस उदास ही गीते आहेत. याशिवाय विविध रागांत त्यांनी सुमारे पन्नास बंदिशी बांधल्या होत्या.  १९५५ ते१९८० या कालावधीत त्यांनी आकाशवाणीवर सातत्याने शास्त्रीय व नाट्यसंगीताचे विविध कार्यक्रम केले . ते आकाशवाणीवरील ‘अ’ श्रेणीचे कलाकार होते. त्यांची नवी दिल्ली, आकाशवाणीवर हिंदुस्थानी संगीताच्या ऑडिशन बोर्ड समितीवर (श्रुतिमंडळावर) नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय ते नागपूर व अन्य काही विद्यापीठांच्या संगीतविषय सल्लागार मंडळावरही होते.
     राम मराठे यांना मिळालेले मानसन्मान १) संगीत भूषण पुरस्कार (१९५१), २)बालगंधर्व सुवर्णपदक (१९७४)
३) संगीत चुडामणी  – जगद्गुरु शंकराचार्य (संकेश्वर करवीर यांच्या हस्ते – १९८०)
४) रामकृष्ण बुवा वझे पुरस्कार (१९८६), ५)संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार (१९८७),
७) नाट्याचार्य विष्णुदास भावे पुरस्कार (१९८७)
८)ठाणे भूषण पुरस्कार (१९८७)
             राम मराठे यांनी त्यांच्या संगीत कारकीर्दीत १९६५ ते १९८९ या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य विद्यादानाचे कार्य केले . त्यांच्या शिष्यवर्गात उल्हास कशाळकर, विश्वनाथ बागुल, योगिनी जोगळेकर,  राम नेने, सुधीर देवधर, शशी ओक, सुरेश डेग्वेकर, प्रदीप नाटेकर, सुधीर दातार, राजेंद्र मणेरीकर इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या संगीताचा वारसा त्यांचे दोन सुपुत्र संजय व मुकुंद हे आणि सुशीला मराठे-ओक व वीणा मराठे-नाटेकर या दोन कन्या व नातवंडे पुढे चालवीत आहेत.
       राम मराठे यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८


बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

! नारायण सीताराम फडके स्मृतिदिन !! (२२ ऑक्टोबर )

!! नारायण सीताराम फडके स्मृतिदिन !!

  (२२ ऑक्टोबर )




 



        नारायण सीताराम फडके जन्म : ४ ऑगस्ट १८९४; मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८ हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. सन १९४९ मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते.
   "अल्ला हो अकबर" (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे.
फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत. त्यांच्या काही कादंबऱ्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत. त्यांच्या कलंकशोभा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक चित्रपटही निघाला होता.
             ना. सी. फडके यांना मिळालेले काही सन्मान आणि पुरस्कार .....
१)रत्‍नागिरी येथे १९४० साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
२) ‘पद्मभूषण’ पुरस्कार (१९६२)
     ना. सी.फडके यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक : राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

!! पोलीस हुतात्मादिन !! (२१ ऑक्टोबर )

 

    !!  पोलीस हुतात्मादिन  !! (२१ ऑक्टोबर )



       २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लदाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी गस्त घालणाऱ्या १० पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्याला पोलीस जवानांनी कडवी झुंज दिली, दुर्देवाने, या हल्ल्यात हे पोलीस शहीद झाले. या घटनेमुळे देशभर शोककळा पसरली. वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी तसेच कर्तव्य आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर 'पोलीस हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो.
अशा देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या कर्तव्यनिष्ठ पोलीस जवानांना भावपूर्ण आदरांजली.
      राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८


सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

!! बाबा कदम स्मृतिदिन !! (२० ऑक्टोबर )

      !! बाबा कदम स्मृतिदिन !! 

   (२० ऑक्टोबर )



              विरसेन आनंदराव कदम उर्फ बाबा कदम जन्म:४ मे१९२९ मृत्यू:२० ऑक्टोबर २००९  बाबा कदम कादंबरीकार  म्हणूनच प्रसिध्द होते.त्यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव वीरसेन आनंदराव कदम असले तरी ते आपल्या वाचक परिवारात बाबा कदम म्हणूनच परिचित होते. त्यांच्या कथा, कादंबर्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढया,वाडे, सरंजामी बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इत्यादी हमखास येणारच यात आश्चर्य नाही. त्यांचे वडील रेसकोर्सवर अधिकारी म्हणून कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांची "अजिंक्यतारा" कथा रेसकोर्सच्या जीवनावर आधारित आहे .

                  बाबा कदम १९५४ मध्ये एल.एल.बी.झाले. फौजदारी वकील डी.एस.खांडेकर यांच्याकडे ते काम करु लागले.१९५९ साली ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले.१९५९ ते १९८७ पर्यंत सरकारी वकील म्हणून २८ वर्षे काम करुन१९८७ साली सेवानिवृत्त झाले. याच त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचा त्यांच्या लेखनावर प्रभाव पडलेला दिसून येतो.

       १९६५ साली त्यांची पहिली" प्रलय" कादंबरी प्रसिध्द झाली.याच कादंबरीवर पुढे "देवा शपथ खरं सांगेन" हा चित्रपट निघाला.१९६६  साली "इंसाफ"या कादंबरीवर ही "अधिकार"हा चित्रपट निघाला. भालू,जोतिबाचा नवस,पांच नाजूक बोटे,बिनधास्त,गर्लफ्रेंड,डेझर्टक्वीन,

निष्पाप बळी, गजरा, बॉम्बे पोलीस,रमी, ज्वालामुखी, दगा, न्याय, रिवार्ड, अशा सुमारे ८० कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या अनेक कादंबरीवर चित्रपट निघाले. निसर्ग जसा आहे तसाच चित्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांनी चित्रपटात देखील काम केले होते.

          २० ऑक्टोबर २००९ रोजी बाबा कदम यांचे निधन झाले.अशा महान साहित्यिकास  स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

     संग्राहक -- राजेंद्र पवार

           ९८५०७८११७८


 

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

!! पांडुरंग शास्त्री आठवले जन्मदिन !! (१९ ऑक्टोबर )

 


!! पांडुरंग शास्त्री आठवले जन्मदिन !!
    (१९ ऑक्टोबर )



           पांडुरंग शास्त्री आठवले जन्म : १९ ऑक्टोबर १९२० मृत्यू : २५ऑक्टोबर २००३  पांडुरंग शास्त्री आठवले "दादाजी" म्हणून सर्वत्र परिचित आहेत. ते समाज क्रांतिकारक, आध्यात्मिक शिक्षक, आध्यात्मिक नेते, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते असून , या परिवाराचे दहा लाखापेक्षा जास्त अनुयायी आहेत. गेले वर्षभर पांडुरंग शास्त्री आठवले यांचे जन्मशताब्दी वर्ष विविध कार्यक्रमांनी साजरे केले गेले.
          पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील रोहा येथे ब्राह्मण कुटुंबात झाला होता. आठवले बारा वर्षाचे असताना त्यांच्या आजोबांनी लहान मुलांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रमाची निर्मिती केली होती. भारताच्या प्राचीन संस्कृतीचे धडे त्यांना घरीच मिळाले. त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्यांनी भगवद्गीता तसेच वैदिक धर्माचा प्रसार जपान, अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशात देखील केला.
                  १९५४ मध्ये जपानमध्ये झालेल्या विश्व तत्वज्ञान परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दादांनी जगातल्या तत्वचिंतकासमोर भारतीय संस्कृती व भगवान योगेश्वर श्रीकृष्णाचे विचार मांडले. अवतारवाद हा विषय स्पष्ट करताना अर्थकारण, राजकारण, शिक्षण, समाजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म व वैश्विक जीवन अशा विविध क्षेत्रात श्रीकृष्णाचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे. दादांच्या मुखातून निघालेल्या  ज्ञानतीर्थाने  सर्व उपस्थित मंत्रमुग्ध व प्रभावित झाले.
       स्वाध्याय परिवारासाठी दर रविवारी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मनाचे शुद्धीकरण करणारी प्रात: प्रार्थना, सांयप्रार्थना गायल्या जातात, व्हिडीओ रेकॉर्डिंग ऐकवले जाते. यामुळे व्यक्ती, कुटुंब व समाज जीवनातील प्रदूषण कमी होत आहे.
        स्वाध्याय म्हणजे " स्व "चा अभ्यास, स्वतःच्या शरीरात असलेला "स्व "म्हणजे चैतन्य तत्व त्याला ओळखणे व दुसऱ्याच्या स्वबद्दल आदर बाळगून त्याचा अभ्यास करणे. विवेक, प्रकाश व जीवननिष्ठा म्हणजे स्वाध्याय. परिवाराचे सदस्य स्वतःला " स्वाध्यायी " म्हणवून
घेतात. वर्षानुवर्षे परिवारातील सदस्यांनी भगवद्गीतेच्या देव, धर्माच्या संकल्पना कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. परिवाराच्या माध्यमातून जाती, धर्म ,सामाजिक, आर्थिक अडथळे  कधीच ओलांडले आहेत. स्वाध्याय परिवारातील  अनुयायी घरोघरी जावून गीतेचे विचार सामान्य लोकांना पटवून देतात. आपल्या देशाबरोबर साधारण ३५ देशात स्वाध्याय परिवाराचे काम चालते. जागतिक पातळीवर समस्यांचे निराकरण करणे, विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणे यासाठी परिवारातील सदस्य झटत असतात. आपला धर्म न सोडता भक्ती करता येते, हे स्वाध्यायाने सिध्द केले आहे. येथे सर्वधर्मसमभावाचा स्वीकार केलेला आहे. या परिवारात मुस्लिम तसेच ख्रिश्चन धर्माचेदेखील अनुयायी आहेत.
              या अलौकिक कार्यामुळे पांडुरंग शास्त्री आठवले यांना  पद्मविभूषण, टेम्पलटन पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, राष्ट्रीय एकता पुरस्कार आदि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा जन्मदिन मनुष्य गौरवदिन म्हणून साजरा केला जातो.
     पांडुरंग शास्त्री आठवले यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८





शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

!! अमेरिकन वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन स्मृतिदिन !! (१८ ऑक्टोबर )



 


!! अमेरिकन वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन स्मृतिदिन !! (१८ ऑक्टोबर )

          थॉमस एल्वा एडिसन जन्म:११ फेब्रुवारी १८४७ मृत्यू:  १८ ऑक्टोबर १९३१  हे एक अमेरिकन संशोधक आणि अभ्यासक होते. फोनोग्राफ्स आणि इलेक्ट्रिक बल्बसह बरीच उपकरणे त्यांनी विकसित केली.  जगभरातील लोकांच्या जीवनात प्रचंड बदल घडवून आणले. औद्योगिक प्रयोगशाळेची स्थापना करण्याचे श्रेय एडिसन यांना जाते. केवळ अमेरिकेत  १०९३पेटंट प्रदान करणारे एडिसन जगातील सर्वात मोठे संशोधक मानले जातात.
       थॉमस अल्व्हा एडिसन  यांनी विजेचा दिव्याच़ा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच़. ११फेब्रुवारी  १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. ते  फक्त ३ महिने शाळेत गेले. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ" आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.एडिसनचे शिक्षण घरीच झाले. सतत नवनवीन प्रयोग करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांच्या  उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याच़े काम केले. १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उच़लून त्याने त्याच़े प्राण वाच़वले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझ़ी यांच़ा होता. एडिसनच़े उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझ़ीने त्याला आगगाडीचा तारायंत्राच़े शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरच़े काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात मग्न असल्यामुळे एडिसनला रात्री झ़ोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच़ घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
         अशा थॉमस अल्वा एडीसन यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक : राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

!! दादोबा पांडुरंग तर्खडकर स्मृतिदिन !! (१७ ऑक्टोबर )

 


!! दादोबा पांडुरंग तर्खडकर स्मृतिदिन !!
    (१७ ऑक्टोबर )



दादोबा पांडुरंग तर्खडकर जन्म:९ मे १८१४ मृत्यू:१७ ऑक्टोबर १८८२ अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक. मुंबई येथे जन्म. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.
               संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी प्रसिध्द  केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी  (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. त्यातून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्‌मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र  (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये. यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक  (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन  (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म  (१८८०) आणि शिशुबोध  (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन  ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्‌स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.
                         ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा ( १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.
        भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. मुंबई येथे ते निधन पावले.स्मृतिदिनाच्या निमित्ताने दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना विनम्र अभिवादन
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश  (लेखक:स. गं. मालशे )
संकलक : राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८


बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

!! जागतिक विद्यार्थी दिन !! (१५ ऑक्टोबर )

!! जागतिक विद्यार्थी दिन  !!
   (१५ ऑक्टोबर )  



         भारताचे माजी राष्ट्रपती विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिन,तर महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती......
       डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला होता. कलाम हे एक भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ होते. ते भारताचे ११ वे राष्ट्रपती  होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या साह्याने ते राष्ट्रपती झाले. त्यांचा कार्यकाळ २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ असा होता. त्यांचे शिक्षण प्रामुख्याने भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये झाले होते. त्यांनी चार दशके  वैज्ञानिक आणि विज्ञान प्रशासक म्हणून विशेषतः संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे घालविली.(इस्रो) हा भारताच्या नागरी अवकाश कार्यक्रम आणि सैन्य क्षेपणास्त्र विकास प्रयत्नांमध्ये त्यांचा जवळून सहभाग होता त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन असेही म्हटले जाते. भारताने १९९८ मध्ये पोखरण अनुचाचणी -२ घेतली होती त्यामध्ये संघटनात्मक  तसेच तांत्रिक भूमिका ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी बजावली होती.
         डॉ. अब्दुल कलाम  यांनी आपला राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यावर  समाजसेवेला विशेषतः शिक्षण कार्याला वाहून घेतले. आपल्या अंतसमयापर्यंत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहिले. शिलाँग येथे आय.आय.एम.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाच हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या ८३ व्या वर्षी २७ जुलै २०१५ रोजी त्यांचे निधन झाले.
     डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अनेक विद्यापीठांनी मानद  डॉक्टरेट दिली.वीर सावरकर पुरस्कार, रामानुजन पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारासह,  भारत सरकारने
पद्मभूषण ,पद्मविभूषण तसेच भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" देऊन  सन्मानित केले.कलाम यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने टपाल तिकीट काढले.
देशविदेशातील अनेक शिक्षणसंस्था, तांत्रिक संस्था, रस्ते यांना डॉ.अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आलेले आहे. डॉ. कलाम यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
DRDO: Defence Research & Development Organization
ISRO : Indian Space Research Organization
      संकलक : राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८
      















सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

!! आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन !! (१३ ऑक्टोबर )

 

!! आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन !! (१३ ऑक्टोबर )



           आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन १३ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आपत्ती व्यवस्थापनात पहिला टप्पा आपत्तीची तीव्रता घटविणे हा असतो. आपत्ती हे मानवी जीवनातील अपरिहार्य असे घटक आहेत. लोकांना वादळे , भूकंप , आग , अतिवृष्टी,महामारी अशा नैसर्गिक आपत्तींबरोबरच युद्ध, दंगली, दहशतवादी हल्ले अशा मानवनिर्मित आपत्तींनाही तोंड द्यावे लागते. कोणत्याही आपत्तीनंतर मदत व पुनर्वसन कार्य हाती घेणे व झालेल्या नुकसानीची नोंद करून नुकसान भरपाई देणे महत्वाचे असते.
     एखादी आपत्ती आल्यानंतर प्रथम तिची तीव्रता कमी करणे. आपत्तीला सामोरे जाणे आणि मदतकार्य व पुनर्वसन करणे या महत्वाच्या बाबी आहेत. यापुढे अशी आपत्ती येणार नाही त्यासाठी उपाय योजना करणे.
       युनोने सदस्य देशासाठी आकृतिबंध तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
यावर्षी संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे. या आजारावर कोणत्याही प्रकारची लस अद्याप उपलब्ध नसल्याने आपणास जास्तच काळजी घ्यावी लागत आहे.
            कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनसारखा उपाय अवलंबला. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी लोकांची मानसिकता महत्वाची असते. लोकांनी उपाययोजना उपक्रमास योग्य प्रतिसाद देणे गरजेचे असते. कोरोनाला काबूत आणण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे आदि उपाय अंमलात आणले पाहिजेत.
         आपण नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सजग झाले पाहिजे. मानवनिर्मित संकटे येणार नाहीत यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.
         राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८







रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

!! आंतरराष्ट्रीय बालिका दिवस मॅरेथॉन !!

 !! आंतरराष्ट्रीय बालिका दिवस मॅरेथॉन !!

       

 २०११ च्या जनगणनेनुसार दर १००० हजार पुरुषांच्यापाठीमागे ९४० स्त्रियांचे प्रमाण होते. स्त्री-पुरुष असमानतेबद्दल समाजात जागरुकता निर्माण करणे हा दिवस साजरा करण्यापाठीमागचा मुख्य उद्देश आहे. मुलींना वाचवणे,त्यांना उत्तम शिक्षण देणे हे गरजेचे आहे, त्याचाच भाग म्हणून आज International Day Of The Girl Child Run  चे आयोजन करण्यात आले होते. आज मी १० कि. मी.मध्ये भाग घेतला होता. आज मी हे अंतर ००.५४.०५ (चोपन्न मिनिटे व ५ सेकंदात )पूर्ण केले. 

           आजच्या दिवसाच्या निमित्ताने  सुनबाई सौ.शितल आणि पुतणी कु.अंजली यांनी देखील अनुक्रमे ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर मध्ये सहभाग घेतला होता.

                आज मला चित्रपट निर्माते मा.मानसिंग पवार व दादासाहेब सुतार यांचेकडून रुट सपोर्ट मिळाला. आपणा सर्वांच्या सदिच्छामुळे मला हे यश प्राप्त झाले. आजच्या दिवसाच्या निमित्ताने मुलींना वाचवुया,त्यांना चांगले शिकवूया, त्यांना समानतेचा अधिकार प्राप्त करुन देऊया हाच संदेश समाजात  पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया.

International day of girl child day run


         राजेंद्र पवार 

        ९८५०७८११७८

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

!!वन्यजीव सप्ताह- १ ते ७ ऑक्टोंबर !!

 वन्यजीव सप्ताह- १ ते ७ ऑक्टोंबर



  रानगवा 


पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे. परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबधच येत नाही आणि येतो तेव्हा दोन्ही बाजूंना फारसा आनंददायक नसतो. ही परिस्थिती बदलण्यासाठीचे प्रयत्न या सप्ताहाच्या निमित्ताने होत आहेत.

        भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. आता या मूळ हेतूचा काळानुसार विस्तार झाला आहे. वन्यजीवांनी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणे समजावून दिली जात आहेत.

      खरे तर कोणताही वन्यजीव स्वत:हून माणसांवर हल्ला करत नाही. परंतु त्यांच्या राहण्याच्या क्षेत्रावर ( अधिवासावर) शेती, रस्ते वा बांधकामाच्या रूपाने होणारे मानवी आक्रमण मर्यादेपलीकडे गेले की ते जंगलाच्या सीमेवरील खेड्यांत घुसून मुख्यत: पोटासाठी गाई गुरे मारतात व त्यातून मानव- वन्यजीव असा लढा उद्भवतो. भारतासहित जगातील इतरही पुरातन संस्कृतींमध्ये सांगितल्याप्रमाणे मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही संपूर्ण पृथ्वीची गरज आहे, कारण वन्यजीवांखेरीज मानव सुखाने राहूच शकणार नाही. ही जागृती रुजवण्यासाठी भारत सरकारने ‘ इंडियन बोर्ड ऑफ वाईल्डलाईफ ’ ची स्थापना पूर्वीच केली आहे.

            जंगल सीमेवरील स्थानिकांना याबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सुविधा पुरवावी तसेच वन्यजीवांबद्दल माहिती मिळवून त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावा; ज्यामुळे त्यांच्या बद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात. तसेच वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास नेहमी विरोध दर्शवावा.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६

फोटो सौजन्य - 

मंगेश ताटे , रेंज फॉरेस्ट ऑफिसर, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर 

अजिंक्य बेर्डे, वन्यजीव छायाचित्रकार , आंबा घाट, कोल्हापूर

   संकलक : राजेंद्र पवार 

        ९८५०७८११७८













 




!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...