!! मदर तेरेसा जन्मदिन !!(२६ ऑगस्ट)
जन्म:२६ ऑगस्ट १९१०मृत्यू:५ सप्टेंबर १९९७
२६ ऑगस्ट १९१० रोजी मसेदोनियातील स्कॉप्जे येथे एक साधारण व्यापारी निकोला बोयाजू यांच्या घरी अगनेस गोंझा बोयाजिजू ने जन्म घेतला होता. यानांच पुढे मदर तेरेसा म्हणुन जग ओळखु लागले. गोंझा चा अर्थ अलबेनियन भाषेत ’कळी’ (फुल) असा होतो. त्यांचे वडील निकोला बोयाजू धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते, ईसा मसीह यांच्यावर त्यांचा फार विश्वास. त्या ज्यावेळी ८ वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तिचा सांभाळ तिची आई द्राना बोयाजूंनी केला. त्या एक धर्मपरायण आणि आदर्श गृहीणी होत्या, मदर तेरेसांवर आईच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा फार प्रभाव पडला. वडिलांच्या अकाली जाण्याने त्यांच्या घरातील परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती त्यामुळे मदर तेरेसा यांचे लहानपण फार संघर्षमय परिस्थितीतीतुन गेले. मदर तेरेसा लहानपणी आपल्या आई आणि बहिणीबरोबर चर्चमधे जाऊन धार्मिक गीतगायन करीत असत. त्या ज्यावेळी केवळ १२ वर्षांची होत्या तेव्हां एका धार्मिक यात्रेला गेलेल्या असतांना येशुच्या परोपकार आणि समाजसेवेच्या शिकवणीला जगभरात पोहोचविण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व आपले संपुर्ण जीवन गरिबांच्या सेवेत समर्पित करण्याचा मनोमन निश्चय केला. १९२८ साली ज्यावेळी मदर तेरेसा फक्त १८ वर्षांच्या होत्या तेव्हां त्यांनी "नन" चा समुदाय ’सिस्टर्स ऑफ लोरेटो’ त सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. पुढे त्या आयरलैंड येथे गेल्या आणि इंग्लिश भाषा शिकल्या कारण ’लोरेटो’ च्या सिस्टर्स इंग्रजी माध्यमातुनच भारतात लहान मुलांना शिकविण्याचे काम करत होत्या. या दरम्यान त्यांनी एका इन्स्टीटयुट मधुन नन होण्याचे ट्रेनिंग पुर्ण केले. नन झाल्यानंतर त्यांचे सिस्टर मेरी तेरेसा असे नामकरण करण्यात आले. पुढे आपले संपुर्ण जीवन गरीब आणि असाहय्य लोकांच्या मदतीकरता त्या व्यतीत करु लागल्या.
मदर तेरेसा आपल्या इन्स्टीटयुट मधील इतर नन समवेत १९२९ साली भारतातील दार्जिलींग येथे आल्या. या ठिकाणी नन या रूपात त्यांनी पहिल्यांदा धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर त्यांना कलकत्ता येथे शिक्षिका म्हणुन पाठविण्यात आले. कलकत्ता येथे डबलिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मैरी स्कूल ची स्थापना केली होती. मदर तेरेसा याठिकाणी गरीब आणि असाहय्य मुलांना शिकवीत असत. त्यांचे हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व होते. सुरूवातीपासुनच त्या अत्यंत मेहनती होत्या त्यामुळे त्यांनी हे काम देखील अत्यंत प्रामाणिकतेने आणि निष्ठापुर्वक केले, त्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका झाल्या. या दरम्यान त्यांच लक्ष आजुबाजुला पसरलेल्या गरीबी, अनारोग्य, लाचारी, व अज्ञानावर गेलं. ते पाहुन त्या अत्यंत दुःखी झाल्या. तो काळ होता जेव्हां दुष्काळामुळे कलकत्ता शहरात मोठया संख्येने मृत्यु होत होते व गरिबीमुळे तेथील जनतेची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली होती. हे पाहुन मदर तेरेसा यांनी गरीब, असाहाय्य, आजारी आणि गरजुंची सेवा करण्याचा निश्चय केला.
गरीब आणि गरजुना मदत करण्याच्या हेतुने मदर तेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पीटल मधुन नर्सिंग चे प्रशिक्षण पुर्ण केले व पुढे १९४८ ला कलकत्ता येथे येऊन त्यांनी स्वतःला गरीब, असाहाय्य आणि वृध्द लोकांच्या सेवेत झोकुन दिले. खुप प्रयत्नांनंतर ७ ऑक्टोबर १९५० ला मदर तेरेसा यांना समाजाच्या हिताकरीता कार्य करणारी "मिशनरी ऑफ चॅरिटी "ही संस्था स्थापन करण्याची परवानगी मिळाली. मदर तेरेसा यांच्या या संस्थेचा उद्देश केवळ गरीब, गरजू, रूग्णं, आणि लाचारांना सहाय्य करणे आणि त्यांच्यात जगण्याची आवड निर्माण करणे हाच होता. या व्यतिरीक्त करूणाहृदयी मदर तेरेसा यांनी ’निर्मल हृदय’ आणि ’निर्मला शिशु भवन’ नावाचे आश्रम सुरू केले. या आश्रमात गरीब आणि आजारी रूग्णांवर उपचार केले जात असत आणि अनाथ व बेघर मुलांना मदत केली जात असे.
मदर टेरेसा यांना आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. १९८३ साली ज्यावेळी त्या रोमला पॉप जॉन पॉल व्दितीय यांच्या भेटीकरता गेल्या तेंव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पुन्हा १९८९ साली हृदयविकाराचा झटका आला तरी देखील त्यांनी त्यांचे सेवाकार्य सुरूच ठेवले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती ढासळतच गेली, १९९१ ला त्यांना किडनी आणि हृदयाचा त्रास सुरू झाला. १९९७ ला मदर तेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख पदावरून निवृत्ती घेतली व ५ सप्टेंबर १९९७ ला कलकत्ता येथे अखेरचा श्वास घेतला. अशा तऱ्हेने या करूणाहृदयी आत्म्याने या जगाचा निरोप घेतला.
मदर तेरेसा यांना मिळालेले पुरस्कार :-
१)पदमश्री (१९६२ )
२)नोबेल शांतता पुरस्कार (१९७९)
३)भारतरत्न (१९८०)
४)मेडल ऑफ फ्रीडम अवॉर्ड (१९८५)
मदर तेरेसा यांनी मानव कल्याणाकरता ज्या निस्वार्थ भावनेने कार्य केलं ते खरोखर वाखाणण्याजोगेआहे. सर्वांनीच मदर तेरेसा यांच्याकडुन परोपकार, दया, सेवा, यांची प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. या महान परोपकारी व्यक्तीला भावपुर्ण आदरांजली…..
संकलन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८