रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

!! अविस्मरणीय - वासोटा ट्रेकिंग !!

       !! अविस्मरणीय - वासोटा  ट्रेकिंग !!
                        आज ०२:०२:२०२० एक वेगळा दिवस, सातारा हिल रनर्सचे श्री. निलेश माने यांनी वासोटा ट्रेकिंगचे आयोजन केले होते. वासोटा ट्रेकिंग साठी साताराहून सात वाजता प्रयाण केले. सातारा ते बामणोली हा प्रवास कारने केल्यामुळे जलद झाला. बामणोलीहून वासोटा येथे जाण्यासाठी आपणास बोटीने प्रवास करावा लागतो. बोटीने प्रवास करण्यासाठी सव्वा तास लागला. कोयनानगर येथे कोयना नदीवर धरण बांधले असून त्यास शिवसागर जलाशय असे संबोधले जाते. हे महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण धरण आहे. याची पाणी साठवणक्षमता १०५ टी. एम. सी. एवढी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण दीड तासाचा वेळ लागतो.
             वासोटा किल्ला कोयना धरणाच्या शिवसागर जलशयामुळे दुर्गम झाला असून अथांग पाण्याने वेढल्यामुळेच वासोटा किल्ल्या भोवतालची अमूल्य जंगलसंपत्ती व वन्यजीवनही सुरक्षित राहिले आहे .समुद्र सपाटीपासूनची वासोटा किल्ल्याची उंची ३६१४ फूट आहे. वासोटा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार वंशीय दुसरा राजा भोजकडे जाते. प्रथमतः शिर्के व मोरे यांचेकडे वासोट्याचा ताबा गेला.
           ६ जून १६६० रोजी शिवरायांनी वासोटा किल्ला जिंकला. शिवरायांनी या किल्ल्याचा वापर कैद्यांना ठेवण्यासाठी केला. राजापूर प्रकरणी पकडलेल्या रेव्हींग्टन व इतर इंग्रजांना शिवरायांनी याच किल्ल्यावर ठेवले होते. आज मात्र सर्वत्र जुन्या बांधकामाचे अवशेष दिसत आहेत. बांधकामासाठी चुन्याची घाणी दिसुन आली. राजवाड्याचा चौथरा झाडीतून स्पष्टपणे दिसून येत आहे. किल्ल्यावर शंकराचे तसेच मारुतीचे मंदिर आहे. ठिकठिकाणी टेहळणी बुरुज आहेत. पाण्याची तळी आहेत. बाबुकडा  एक अवघड बुरुज आहे. तेथून आपण रत्नागिरी जिल्ह्यातील गावे सहजपणे बघु शकतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे वन्य प्राण्यांचे जतन व्यवस्थित रित्या झालेले आहे. प्रामुख्याने तेथे वाघाबरोबर, तरस, गवा, सांबर, राण उंदीर, साळींदर, उद मांजर, हरीण यासारखे अनेक  प्राण्यांचा या जंगलात आदिवासी दिसून येतो. विविध जातीचे पक्षी आश्रयासाठी आहेत.
         आपल्या जीवनामध्ये जंगलांना अनन्यसाधारण महत्व आहे. ते वन्यजीवांच्या आदिवसासाठी उपलब्ध तर आहेतच तसेच ते मानवासाठी उपकारक आहेत.
          आपण जंगल, वन्यप्राणी, पशु पक्षी यांचे संवर्धन करायला हवे. तसेच अश्या ऐतिहासिक ठिकाणी आयुष्यात एकदातरी भेट देऊन इतिहासही जाणून घ्यायला हवा.

वन पर्यटन - राजेंद्र पवार
मोबा - 9850781178

















1 टिप्पणी:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...