मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

!! मराठा बिझनेस फोरम !!
     गुणवत्तापूर्ण काम  हाच यशस्वीतेची पाया--
                                      राजेंद्र मोहिते  




            मराठा बिझनेस फोरमने आयोजित केलेल्या सातारा सिटी बिझनेस सेंटर येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उद्योजक राजेंद्र मोहिते म्हणाले की, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा, ते गुणवत्तापूर्ण करा तेच काम आपणास यशोशिखरावर नेऊन पोहोचवते. गुणवत्तापूर्ण काम हाच यशस्वीतेचा पाया आहे. ते पुढे म्हणाले की, आपण नेहमी नवनवीन प्रयोग करावेत. कोणतेही काम करताना अडचणी येणारच. अडचणीवर तुम्ही कशी मात करता त्यावरच यश अवलंबून असते. नेहमी यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा वाचाव्यात. त्यांचे अनुकरण करावे. इतर व्यावसायिकानी कशी प्रगती केली आहे हे पाहिले पाहिजे. शासकीय अधिकारी यांचेशी आपला संपर्क चांगला असला पाहिजे. मार्केटिंगमध्ये आपली वाणी गोड असायला हवी. रिटायरमेंटचे वय नसते फक्त आपली मानसिकता तयार झाली पाहिजे.  नुसता तरुणपणाचा न्हवेतर साठ ते सत्तर वयोगटाचा काळही अधिक कार्यक्षमतेचा असतो. मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातून उद्योजकतेला पोषक वातावरण तयार होत असलेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
         सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुरग्रामचे सुरेंद्र काकडे यांनी केले.ते म्हणाले की, प्रत्येकजण काम करण्यासाठी उत्सुक आहे फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. व्यावसायिकाना येणाऱ्या अडचणी फोरमच्या माध्यमातून सोडवल्या जातील. प्रगती करायची असेल तर वैचारिक मतभेद विसरले पाहिजेत. आपला व्यावसायीक  अभ्यासही सखोल हवा.
            यावेळी प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांनी फोरम राबवत असलेल्या सर्व उपक्रमाची माहिती दिली. यावेळी सर्व व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती सांगितली. फोरमच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. आभार जगदिश शिर्के यांनी मानले. सदरच्या कार्यक्रमास अनेक व्यावसायिक, उद्योजक उपस्थित होते.
        आजच्या कार्यक्रमातून एकमेकांना भेटून, व्यवसाय वाढवण्याचे तंत्रच उपस्थित सदस्यांना मिळाले असे मला वाटते.
 शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

सोमवार, २७ जानेवारी, २०२०


!! शिवार साहित्य संमेलन  !!
       शेतीमधील स्त्रियांचे योगदान मोलाचे -- सचिन प्रभुणे
    महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व  महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने अतीत जि. सातारा येथे
बाळासाहेब लोहार यांचे शेतावर "शिवार साहित्य संमेलन" आयोजित करण्यात आले होते.



 या संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना सातारा आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सचिन प्रभुणे म्हणाले की, ज्या कुटुंबातील स्त्रिया शेतीत अधिक कष्ट करतात त्या कुटुंबाची अधिक प्रगती  होते हे वास्तव आहे. या वस्तुस्थितीचा विचार करून आपणास येणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा स्त्रियांना द्यायला हवा.  मिळालेल्या वाट्याचाही योग्य विनियोग त्यांच्याकडून होईल व कुटूंबाची आर्थिक वृध्दी होईल. सचिन प्रभुणे पुढे म्हणाले की,शेती आणि शिक्षण हेच प्रगतीचे मूळ आहेत. शेती आणि साहित्य दोघेही निर्माते आहेत. साहित्य संमेलनात शेतीवर परिसंवाद व्हायला हवेत. शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे शिक्षणात तर क्रांती झालीच त्यामुळे आपोआपच सामाजिक बदल घडून आले. महाराष्ट्र तसेच देशाच्या प्रगतीमध्ये या समाजसुधारकांचा वाटा मोठा आहे.
       संमेलनाचे उदघाटन नागठाणे येथील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी मनोहर साळुंखे यांचे हस्ते झाले. उदघाटनपर भाषणात ते म्हणाले की, शेती हा व्यवसाय अतिशय उत्तम आहे बऱ्याचवेळा आपणच आपल्या व्यवसायाला कमी लेखतो. शेतीकडे व्यवसाय म्हणून पहात नाही. दिवसातील ठराविक वेळ शेतात काम केले पाहिजे. नुसतेच ऊस शेतीच्या मागे न लागता कमी कालावधीची भाजीपाला, फळे यासारखी नगदी पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत जेणेकरुन दररोज पैसे मिळतील.
      यावेळी डॉ. सुधाकर बेंद्रे यांनी फास (आता कसले डोळे पुसता, शोक करायचे नाटक करता, असेच दिसलं माळावर एक रोपटं ), सुहास चव्हाण यांनी ( दिल्लीत उठलेल वादळ, गल्लीपर्यंत पोहोचवायच, कर्जाच घुंगरू बनुन आमच्या काळजावरती नाचायच, काळ्या आईची आम्ही लेकरं ), प्रमोद मोहिते यांनी ( चिऊ मरुनिया गेली, पाणी शोधत तळ्यात ), डॉ. उमेश करंबेळकर  यांनी (आताशा  मी माणसापेक्षा झाडातच जास्त रमतो ). शाहीर लोखंडे यांनी ( येऊन बघ एक दिवस माळात माझ्या, अग चल ग चिऊताई एक कविता करु. अवकाळी पाऊस लेका खुळा म्हणून पडत नाही. खरा महाराष्ट्र बोलतोय शेती संपावर गेली तर) , अजित जाधव यांनी( लेक परक्याची कमाई), या कविता सादर केल्या. तर गणेश उतेकर यांनी बाप या विषयावर  कथा सांगितली. अजित साळुंखे यांनी मनोहर साळुंखे यांच्यावर डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी तयार केलेली कविता वाचून दाखवली.
     यावेळी  पोपटराव पवार , राहीबाई पोपेरे या पदमश्री पुरस्कार प्राप्त राज्यातील शेतकऱ्यांबरोबर सातारा जिल्ह्यातील अशोक इंगवले (बिदाल), संजीवन फाळके (सातारा रोड), कुसूमताई कर्पे (कर्पेवाडी), या शेतकऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी , सूत्रसंचालन साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अजित साळुंखे यांनी तर आभार कार्यवाह नंदकुमार सावंत यांनी मानले.
       कार्यक्रमास  चंद्रशेखर बेबले,संजय नलवडे यांचेसह परिसरातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. आपण शेती तसेच शिक्षण याबाबीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे यामुळेच आपली प्रगती होणार आहे असे मला वाटते .
   शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

           ऊसाचे अधिक उत्पादन मिळणेसाठी मर्यादित पाणी आवश्यक  -- शिवराज लोणाळे



        वर्णे येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन,ग्रामपंचायत तसेच रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संयुक्त विद्यमाने ऊस शेतीसंदर्भात एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना शिवराज लोणाळे म्हणालेकी,ऊसाचे अधिक उत्पादन होणेसाठी शेतीला मर्यादित पाणी देणे आवश्यक आहे. मर्यादित पाणी देणेसाठी ठिबक संच प्रणालीचा वापर आवश्यक आहे.अधिक उत्पादन वाढीसाठी पाण्याबरोबरजमिनीची सुपीकता, लागवडीची योग्य पध्दत,रासायनिक खतांच्या योग्य मात्रा या बाबीसुध्दा महत्वाच्या आहेत.
        आपण ठिबकद्वारे पाणी दिलेतर पाण्याची बचत होते ,खते कमी लागतात,मजूर कमी लागतात, उत्पादनाचा दर्जा वाढतो, रोग आणि किडींचे प्रमाण कमी होते.ठिबकद्वारे पाणी देताना आपण फिल्टरसिस्टीम व्यवस्थित ठेवायला हवी त्यामध्ये घाण किंवा क्षार साचून राहिले तर योग्य दाबाने पाणी जात नाही.
      ज्ञानदा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्रमोद शिंदे यांनी कृषी क्षेत्रातील व्यवसाय संधी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी कांदा, लसूण, आले, मिरची,शेंगदाणा,सोयाबीन, शेवगा आदि पिंकाबाबत कसे मूल्यवर्धन करता येईल याबाबत सचित्र माहिती सांगितली.
        उत्पादनाबरोबर मार्केटिंग कसे महत्वाचे आहे याविषयी अमोल कदम म्हणाले की, आपणास आपल्या मालाचे ब्रँडिंग करता आले पाहिजे. व्यवसाय वृध्दीसाठी शासनाच्या स्टार्टअप, मुद्रा अशा योजना आहेत त्याचा लाभ आपण घ्यायला हवा.ते ऊसापासून बनवलेले पदार्थ सहा देशात विकत आहेत.
      वर्णे येथील कृषी सहाय्यक पूनम ढवळे यांनी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, अपघात विमा आदींची माहिती सांगितली. राजेंद्र साबळे यांनी प्रास्ताविकाबरोबर सूत्रसंचालनही केले. तर आभार वर्णे हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी मानले.
     या कार्यक्रमासाठी रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत कुलकर्णी, दत्तात्रय खोत,सुधीर पाटील,श्रध्दा इरिगेटर्सचे उमेश जाधव यांचेसह वर्णे आणि वर्णे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
      आजच्या कार्यक्रमातून ऊसाचे उत्पादन कसे वाढवावे,कृषी क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी,उत्पन्न वाढीसाठी मूल्यवर्धन कसे करावे याबतची माहिती मिळाली. शेतकऱ्यांनी शेतीविषयक प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उत्पादन वाढीबरोबर आपला आर्थिक स्तर उंचवावा असे मला वाटते.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

     

रविवार, १९ जानेवारी, २०२०

!! टाटा मुंबई मॅरेथॉन !!

!! टाटा मुंबई मॅरेथॉन !!

       आज १९ जानेवारी, मी टाटा मुंबई मॅरेथॉनच्या हाफ मॅरेथॉन(२१:०९७) भाग घेतला होता. आज मी ही स्पर्धा ०२:०१:२७ (दोन तास एक मिनिट सत्तावीस सेकंदात) पूर्ण केली.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी साताराहुन  अनेक रनर्स आलेले होते. माझ्या समवेत सातारामधील पुंडलिक नलवडे होते. ते आणि मी समव्यावसाईक असल्याने चांगलाच स्नेह जुळून आला.आजच्या स्पर्धेचा प्रारंभ पर्यावरण मंत्री मा.आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला.
          स्पर्धेचा प्रारंभ  वरळी येथून झाला.आज आम्हाला सीलिंकवरुन धावण्याची संधी मिळाली. एरव्ही पादचाऱ्यांना त्या मार्गावर परवानगी नसते.रुटसपोर्ट एकदमच छान होता. ठीकठिकाणी वाद्यवृंद स्पर्धकांचा उत्साह वाढवत होते.
      टाटा मुंबई मॅरेथॉन ही आशिया खंडातील नावाजलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेत भाग घेतल्याने इतर अनेक स्पर्धेत भाग घ्यायची संधी मिळते.आज देश आणि विदेशातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. संपूर्ण देशच एकत्र पहायला मिळाला.माझ्या यशाचे श्रेय सातारा हिल रनर्सचे श्री. माने सर आणि त्यांच्या टीमला जाते.
         आपण अशा प्रकारच्या स्पर्धेत भाग घेऊन आपले आरोग्य सुदृढ बनवूया. आपण इतरांना आरोग्याबाबत जागृत करावे असे वाटते.
 शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८




बुधवार, ८ जानेवारी, २०२०

!! एकंबे येथील महादेव मंदिर व परिसर विकास बहुउद्देशीय प्रकल्पास भेट !!

     !! एकंबे येथील महादेव मंदिर व परिसर विकास बहुउद्देशीय प्रकल्पास भेट  !!



          आज एकंबे ता. कोरेगाव येथील महादेव मंदिर व परिसर विकास बहुउद्देशीय प्रकल्पास भेट  देण्याचा योग श्री गोरख चव्हाण व त्यांच्याकडे आलेले बीड येथील पाहुणे ह.भ. प. पुंडलिक पाखरे यांच्यामुळे आला. एकंबे येथील एकंबे विकासरत्न,भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त व सचिव श्री. गोरख चव्हाण यांच्या संकल्पनेतून व ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांचे सहकार्याने  हा बहुउद्देशीय प्रकल्प विकसित होत आहे. श्री गोरख चव्हाण हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. प्रथम त्यांचेविषयी थोडेसे सांगितलेच पाहिजे. हा माणूस नोकरी
, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला जातो. मराठी माणूस संरक्षित क्षेत्र निवडतो पण गोरख चव्हाण यांनी वेगळी वाट चोखाळली. नोकरीतून लवकरच मुक्त झाले आणि व्यवसायात पदार्पण केले. त्यांनी श्री विनय इंजिनिअरिंग सर्विसेस प्रा.लि. या कंपनीची स्थापना ३६ वर्षांपूर्वी केली. तिचे कार्यक्षेत्र भारतभर आहे. कंपनीचे वॉटर, वेस्ट वॉटर मॅनेजमेंटमध्येच प्रामुख्याने काम आहे. या कंपनीमध्ये ४०० पेक्षा अधिक लोकांचा स्टाफ आहे. खरेतर हा व्यवसाय भागीदारीत आहे. भागीदारीत  मराठी माणसाचा व्यवसाय टिकत नाही हेही गोरख चव्हाण यांनी खोटे ठरवले आहे.आपला व्यवसाय सांभाळत गावच्या विकासाकडे लक्ष द्यायला  त्यांनी सुरुवात केली. ते शिवकृपा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कुटुंबप्रमुख म्हणून सहकार क्षेत्रात परिचित आहेत. त्यांनी सलग २८ वर्षे   अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याकाळात पतसंस्थेस उर्जितावस्था प्राप्त झाली. पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना सहकार भूषण, सहकार रत्न अशा अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेकांना पतसंस्थेत नोकरीची संधी मिळाली. शिवकृपा पतसंस्था व एकंबे गाव यांचे एक वेगळे अनोखे नाते आहे. श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व शिवकृपा  संस्थेच्या माध्यमातून एकंबेकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर वृक्षारोपण केलेले आहे. ही वृक्षलागवड गावाच्या वैभवात भर घालत आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी वर्णे येथील आबापुरीच्या डोंगरावरील श्री काळभैरव मंदीरासमोर भव्य मंडप उभारला आहे. हा माणूस गावाचा विकास करु शकतो हे सर्व जनतेला मनोमन पटले म्हणून संपूर्ण गावाने त्यांना विकासरत्न ही पदवी बहाल केली.
                गोरख  चव्हाण  यांच्या  काम   करण्याच्या  पध्दतीमुळे, त्यांच्यावर ग्रामविकासाच्या अनेक जबाबदाऱ्या पडत गेल्या. यापूर्वी गावात २००३ मध्ये भैरवनाथ मंदिराची  सुंदर वास्तू उभी राहिली हे मंदिरदेखील वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिराला जोडूनच शिवशंभो वाचनालयाची, अभ्यासिकेची निर्मिती केली. येथील वाचनालय व अभ्यासिका फर्निचरसह सुसज्ज आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वाचनालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. सन २००४ मध्ये त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांचे सहकार्याने स्मशानभूमीचा परिसर विकसित केला. तेथे संपूर्ण परिसराला तार कंपाऊंड, वृक्षारोपण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. "एकंबे गावचा विकास हाच आमचा ध्यास" या ध्येयाने प्रेरित होऊन श्री गोरख चव्हाण  काम करीत आहेत. थोडक्यात गावच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे.या सर्वाचा परिपाक म्हणून महादेव मंदिर परिसर विकासाची जबाबदारी त्यांचेवर  नव्याने पडली. महादेव  मंदिर परिसर विकासात पुढील बाबींचा समावेश आहे.१)मुख्य प्रवेशद्वार व स्वागतकमान
२)संरक्षक भिंत व कुंपन
३)महादेव मंदिर
४) विहीर
५)दशक्रिया विधी व उत्तरकार्य विधीची जागा
६) महादेव उद्यान
७) बालगोपाळ उद्यान
८)पाणी व स्वच्छता
९) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
          महादेव मंदिर हे  हेमाडपंथी रचनेचे आहे. या परिसराच्या विकासासाठी आतापर्यंत ३० लाखापेक्षा अधिक खर्च झालेला आहे. येथील विहीर ही परिसरातील सर्वात मोठी विहीर आहे. येथील बागकाम लक्षवेधक आहे. आजही मंदिर परिसरात वेगवेगळी कामे चालू आहेत. गोरख चव्हाण यांचे सारखा माणूस प्रत्येक गावात एकेक तयार झाला तर
महाराष्ट्र प्रगतीपथावर जाण्यास वेळ लागणार नाही. चला आपणही आपला वैयक्तिक प्रपंच नेटका करुन समाजाच्या विकासातदेखील वाटा
उचलूया.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...