!! सातारा हील हाफ मॅरेथॉन !! (१४ सप्टेंबर)
आज रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सातारा हील हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. आज मी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता, आजची स्पर्धा (२:३९:३९)दोन तास एकोनचाळीस मिनिटे आणि एकोनचाळीस सेकंदात पूर्ण केली.
स्पर्धेचा प्रारंभ सकाळी ६:३० वाजता मान्यवरांच्या फ्लॅग ऑफने झाला. स्पर्धेपूर्वी राष्ट्रगीत (जन गण मन) झाले. वातावरण देशप्रेमाने भारावून गेले होते. सातारची स्पर्धा देशातल्या पहिल्या पाचमध्ये गणली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक आले होते. सर्व देश एकत्र पाहण्याचा योग आला असे म्हटले तर वावगे होणार नाही.
स्पर्धेचे संयोजन अतिशय नेटके केले होते पण काल दुपारपासून सुरु झालेला पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. त्यामुळे ग्राउंडवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले होते. मात्र अशाही परिस्थितीत संयोजनात कोठेही कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली जात होती. रूट सपोर्ट लाजवाब होता. आज मला सपोर्ट करण्यासाठी चिरंजीव श्रीधर, सूनबाई शितल, नातू वेद आले होते. भविष्यात तेही अशा स्पर्धेत भाग घेतील असे वाटते.रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सातारकर नागरिक स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय!, जय भवानी, जय शिवाजी!, जय श्रीराम!, गणपती बाप्पा मोरया !! असा गजर सर्वत्र होत होता.ठीकठिकाणी वाद्यवृंद होते. वाद्यवृंदाच्या ठेक्यामुळे पाऊले वेगात पडत होती. एनर्जी ड्रिंक, केळी, चिक्की , पाणी याची रेलचेल होती.मी या सेवेचा पुरेपूर लाभ घेतला.
घाटातील वळणावळणाची वाट , त्यावर धावणारे स्पर्धक हे दृश्य मनमोहक होते. काही ठिकाणी धबधबे लक्ष वेधून घेत होते. काही स्पर्धकांनी फोटोचा आनंद लुटला. आजच्या स्पर्धेत सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अनेक अधिकारी धावले.
मॅरेथॉनच्या माध्यमातून सशक्त भारत बनवण्याचे काम चालू आहे. आपण सर्वांनीच अशा स्पर्धेत भाग घेऊन स्वतःला तंदुरस्त करावे असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८