बुधवार, १५ मे, २०२४

!! उद्योजक श्रीकांत पवार यांचा आज जन्मदिन !! (१६ मे )

 !! उद्योजक श्रीकांत पवार यांचा आज जन्मदिन !! (१६ मे )

                 टॉप गिअर ट्रान्समिशनचे सर्वेसर्वा श्रीकांत पवार यांचा आज जन्मदिन. श्रीकांत पवार हे पहिल्या पिढीतील उद्योजक होत. थोडक्यात काय तर कुटुंबाला उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. वर्णे गावच्या भूमिपुत्राचा  उद्योजकतेचा प्रवास कसा झाला याविषयी माहिती जाणून घेऊया. 

                  श्रीकांत पवार बी. ई.(प्रॉडक्शन) झाले. सुरुवातीला काही वर्षे एका उद्योगात  नोकरी केली. नोकरी करत असताना सातारा एम.आय.डी.सी.मध्ये आपल्या कुटुंबियांच्या सहकार्याने एक सिक युनिट विकत घेतले. त्याचे सिध्दगिरी एंटरप्राइजेस असे नामकरण करण्यात आले. सुरुवातीला इमारतीसाठी लागणाऱ्या खिडक्या, दरवाजे व ट्रॅक्टर ट्रॉल्या  कॅन्सट्रक्शन मशीन बनवण्याचे काम केले जात होते. नोकरी व व्यवसाय अशा दुहेरी  भूमीका काही दिवस केल्या नंतर त्यांनी नोकरी सोडून पूर्ण व्यवसाय  करण्याचे ठरवले. अनेक अडचणीना तोंड देत त्यांनी १९९८ ला टॉप गियर ट्रान्समिशनची स्थापना केली.  

                 श्रीकांत पवार यांना प्लॅनेटरी गिअर बॉक्स हा विषय मनापासून आवडायचा. आवडीच्या क्षेत्रात काम करायला प्रत्येकालाच आवडते. कॉलेज जीवनापासूनच गियर या विषयाची आवड असलेमुळे अनेक प्रकारचे गियरबॉक्सचे संशोधन आणि डिझाईन ही त्याच्या रूपाने भारतीय उद्योगाला मिळालेली  एक देणगीच आहे . त्यासाठी भारताचे पूर्व राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम साहेबाचे हस्ते त्यांना नॅशनल अवॉर्ड फॉर इंडिजिनेशन ऑफ टेकनॉलॉजि व असेच अनेक बहुसंख्य राष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत.

                  टॉप गियर मध्ये तयार होणारे गियर बॉक्स जगातील २५ देशात निर्यात होतात. तसेच भारतात अनेक ठिकाणी टॉप गियरचे गियर बॉक्स वापरले जातात. यामधे केमिकल, प्लास्टिक, खाणी, पोलाद डिफेन्स, मोबाईल क्रेन अशा ठिकाणी तर साखर उद्योगामध्ये भारतात टॉप गिअरचे गियर प्राधान्याने वापरले जातात. गियर बॉक्स  निर्मितीमध्ये टॉप गिअरचे नाव जागतिक नकाशावर झळकत आहे.

                   शेतीत यांत्रिकिंकरण आले आहे, शेतकऱ्यांची गरज ओळखून पॉवर टिलरचे उत्पादन पाच वर्षांपासून सुरु केले आहे. आज त्यांची उत्पादने जगातील  २५ देशात जात आहेत. आज साहेबांच्यामुळे प्रत्यक्ष ४५० पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. साहेबांच्यावर आर्ट ऑफ लिव्हिंगचा खूप प्रभाव आहे. काडसिद्धेश्वर महाराज व श्री श्री रविशंकरजी यांचा कृपाआशीर्वाद श्रीकांत पवार यांना लाभला आहे. वर्णेचा काळभैरव त्यांच्या पाठीशी आहेच. ते आपल्या कामगारांसाठी सातारा तसेच वर्णे येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सचे नियोजन करतात. दरवर्षी आपल्या वाढदिवसाला गुणवंत कामगार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. 

                  सध्या टॉप गिअरमध्ये डिफेन्सला लागणाऱ्या गिअर बॉक्सची निर्मिती होत आहे त्याचप्रमाणे कमी पल्याची क्षेपणास्त्र गिअर बॉक्सची चाचणी सुरु आहे. टॉप गिअरचे कामकाज कोल्हापूर येथील फौंड्री ते कोईमतूर येथील फॅक्टरी असा सातारा बाहेर विस्तार झाला आहे. आज जगभरातल्या पेट्रोलियम विहिरीवर टॉप गिअरचे गिअर बॉक्स वापरले जात आहेत. तसेच इतर निर्मिती क्षेत्रात विशेषतः भारतातील पोलाद,अल्युमिनियम, लिग्नाइट ,कोल निर्मितीमध्ये टॉप गिअरचे योगदान खूपच मोठे आहे. भविष्यात भारताबाहेरसुध्दा निर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे, असं जरी असलेतरी आपले मुख्यालय आपल्या मूळगावी वर्णे येथेच असावे असे साहेबांना वाटते. टॉप गिअरच्या ऑफिसच्या शाखा पुणे, कोईमतूर, चेन्नई, दिल्ली, कलकत्ता येथे आहेत.

                गेल्याच महिन्यात भारत सरकारकडून "कॉम्पॅक्ट शाफ्ट माउंटेड गिअर बॉक्स वुईथ रिजिड कपलिंग फॉर शुगर मिल्स" हे पेटंट  त्यांना मिळाले आहे.

                  आपला उद्योग संभाळत इतर सामाजिक उपक्रमातही साहेबांचा वावर आहे. ते वर्णे येथील शिक्षण संस्थेचे (वर्णे ग्रामविकास मंडळ, मुंबई ) अध्यक्ष आहेत. त्यांच्यामुळे वर्णे  येथील शाळेत व्यवसाय शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. गतवर्षी त्यांनी शाळेसाठी देखणे वर्कशॉप बांधून दिले आहे. वर्णे विद्यालयाला सुंदर वास्तू साहेबांच्यामुळे लाभली. विस्तारित इमारत पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पहिल्या पिढीतील उद्योजक म्हणून सातारा आकाशवाणीवर साहेबांची मुलाखत झाली होती. या मुलाखतीमुळे अनेक नव उद्योजकांना प्रेरणा मिळाली आहे.

                   श्रीकांत पवार एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे त्यांना आपल्या उद्योगाचा विस्तार करावयाचा आहे. यामध्ये त्यांचे सर्व कुटूंब त्यांना मोलाची साथ देत आहे. त्यांच्या रूपाने गावातच उद्योगाची उभारणी होत आहे. ही बाब गावाच्या दृष्टीने भूषणावह आहे. गतवर्षी सूक्ष्म, मध्यम, लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते श्रीकांत पवार यांना सन्मानित करण्यात आले होते.

                   श्रीकांत पवारांचा मुलगा सौरभ हा अमेरिकेत मास्टर इन सायन्स असे उच्च शिक्षण घेऊन मायभूमीत परतला आहे. सौरभच्या संकल्पनेतून  हायड्रॉलिक मोटार निर्मितीचा भारतातील पहिला प्रोजेक्ट सुरु झालेला आहे. सौरभ नुकताच मासचा  संचालक झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. श्रीकांत पवारांना उद्योगात उंच भरारी घ्यायची आहे. ते भरारी घेतीलच त्याचा फायदा देशवासियांना होईल. परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावे. श्रीकांत पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

                 राजेंद्र पवार

                 ९८५०७८११७८

                  ८१६९४३१३०६

सोमवार, १३ मे, २०२४

!! चित्रपट निर्माते मानसिंग पवार यांचा आज जन्मदिन !!(१४ मे)

 !! चित्रपट निर्माते मानसिंग पवार यांचा आज  जन्मदिन !!(१४ मे)

       आपल्या  वर्णे गावचे सुपुत्र मानसिंग पवार यांचा आज जन्मदिन, आजच्याच दिवशी १४ मे १९५१ रोजी त्यांचा जन्म झाला होता. आज त्यांचा ७३ वा वाढदिवस, मानसिंग पवार यांना वर्णेकर ग्रामस्थ आदराने "बापू" असे म्हणतात.

                    बापूंच्या विषयी थोडीसी माहिती आपण जाणून घेऊया. मानसिंग पवार  ग्रामीण महाराष्ट्राचे रोल मॉडेल आहेत. ग्रामीण भागातून  जावून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी आपल्या आवाजाने मोहिनी घातली. त्यांनी शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवण्याचे काम केले. शेतकऱ्यांना समृध्द आणि आनंदी करण्याचे मोठे काम बापूंनी केले. विद्यार्थी जीवनापासूनच त्यांना चित्रपट क्षेत्राची आवड होती.त्यांनी ७ मराठी चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन केले असून ते चित्रपट खालीलप्रमाणे

१)पोलिसाची बायको

२)सातबारा

३)थोरली बहीण

४)एकांत

५)नाईट स्कुल

६)चल गजा करु मजा

७)बुगडी माझी सांडली ग

        मानसिंग पवार यांनी अनेक शेतीविषयक मालिकांचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. त्या पुढीलप्रमाणे': 

१)असे पाहुणे येती  २)प्रपंचमाया  ३)इन्स्पेक्टर प्रताप  ४)सुजन वाक्य कानी पडो  ५)गप्पा गोष्टी  ६)तंत्र नव्या शेतीचे ७)सर्जा राजा ८)शुभ मंगल सावधान  ९)सुजलाम सुफलाम  ९)भूमी  १०) स्वच्छतेकडून समृद्धीकडे ११)वृत्त वेध १२)उद्योग लक्ष्मी १३)खेतसे बजारतक

              "आमची माती आमची माणसं" ह्या मालिकेतील त्यांचे सह्याद्री वाहिनीवरील संध्याकाळी ६.३० चे निवेदन सर्वांना भुरळ पाडणारं होतं. सर्जा राजा ही त्यांची अतिशय गाजलेली मालिका, आजही सर्जा राजा नुसतं नाव काढले तरी मानसिंग पवार यांची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. या मालिकेतून शेतकऱ्यांचे बैलाविषयी असणारे भावनिक प्रेम व्यक्त केले आहे. या मालिकेतील मधू कांबीकर, उदय म्हैसकर यांचे काम आजही लोकांच्या स्मरणात आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्र शासनाने राबवले होते. या अभियानातील बक्षीसपात्र गावांच्या यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम मानसिंग पवार यांनी केले आहे.

          आज पवार साहेबांच्या नावावर ४ नाटके देखील आहेत. त्यांनी विविध जाहिरातीसाठी आपला आवाज दिलेला आहे. एखाद्या कृषी प्रदर्शनास आपण भेट दिली तर सर्वत्र मानसिंग पवार यांचा आवाज कानी पडतो. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्याशी त्यांचे खूप जवळचे नाते होते. त्यांनी एक हजारपेक्षा जास्त रेडिओ कार्यक्रम केलेले आहेत तर दूरदर्शनवर राज्यातील अनेक नामांकित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत.

         मानसिंग पवार यांची कर्मभूमी मुंबई असली तरी आपल्या जन्मभूमीबद्दल खूपच प्रेम आहे. वर्णे येथील फूल शेतीचे ते किमयागार आहेत. त्यांच्यामुळे वर्णे हे फुलांचे गाव म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर ओळखले जात होते. शेती,शिक्षण, आरोग्य हे त्यांच्या आवडीचे विषय. वर्णे ग्रामविकास मंडळ, मुंबई या स्थानिक शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. आजही ते विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. आजही ते शेतीत विविध प्रयोग करत आहेत. मानसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली "पैरा शेतकरी उत्पादक गट" निर्माण केला असून, या गटाच्या माध्यमातून सध्या बीजोत्पादनाचा उपक्रम राबवला जात आहे. फलोत्पादन वाढीकडे विशेष लक्ष आहे.

         सुरुवातीच्या काळात मानसिंग पवार हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझरमध्ये जनसंपर्क व्यवस्थापकपदी कार्यरत होते. त्यांनी आपल्या सेवकाळात आरसीएफ ला खूप उंचीवर नेऊन ठेवले होते. त्याचा परिपाक म्हणून  सेवानिवृत्तीनंतरचा २५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर देखील त्यांना प्रतिष्टेचा "जीवन गौरव" पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्याला तत्कालीन सहा. कार्यकारी संचालक, अध्यक्ष यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. निवृत्तीनंतर २५ वर्षांनी देखील एखाद्या व्यक्तीची व्यवस्थापन दखल घेते यातच त्यांची महनीयता दिसून येते.

     मानसिंग पवार यांच्या संसारवेलीवर अनु आणि रणजितच्या रुपाने दोन फुले उमलली. मला याप्रसंगी रणजितबद्दल थोडीसी माहिती सांगितलीच पाहिजे. अर्थमंत्रालयाच्या सेबी या संस्थेसाठी काम करणाऱ्या व सेबीला सल्ला देणाऱ्या डेटा कमिटीवर रणजित पवार काम करत आहेत. तसेच नुकतीच रणजित पवार यांची लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप वर दक्षिण आशियायी देशांसाठी माहिती संकलन आणि विश्लेषण या विभागासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. आपल्या गावाच्यादृष्टीने ही बाब भूषणावह आहे.

           " कर्म हीच पूजा" हा मूलमंत्र जपणारे, सतत प्रगतीचा ध्यास असणारे, शेतकऱ्यांना आनंदी व प्रगत बनवणारे असे मानसिंग पवार यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा.

         राजेंद्र पवार

         ९८५०७८११७८

          ८१६९४३१३०६

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...