रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

शतकी धाव पूर्ण ..... १०० किलोमीटर विनियार्ड अल्ट्रा मॅरेथॉन

 !! विनियार्ड अल्ट्रा मॅरेथॉन १०० कि .मी. !! (१८ फेब्रुवारी) 

                   सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि ब्ल्यू ब्रिगेड  फाउंडेशन नाशिक तर्फे १४ फेब्रुवारीपासून विनियार्ड अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले होते. मी यावेळी १०० किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता.  मी ही स्पर्धा १८:४५:०० ( अठरा तास  पंचेचाळीस मिनिटे) या कालावधीत पूर्ण केली. अन्य स्पर्धामुळे  अधिकृत निकाल येण्यासाठी वाट पाहावी लागली. 



                   शेत शिवारातून होणारी देशातील सर्वात दीर्घ अंतराची ही एकमेव मॅरेथॉन स्पर्धा होती. मध्येच रस्ता तर दोन्ही बाजूला द्राक्षाच्या बागा होत्या. काही ठिकाणी कांदा तर गव्हाची पिके डोकावताना दिसत होती. परिसरात पालखेड धरण असल्याने पाण्याची मुबलकता सर्वत्र जाणवत होती. शेत रस्ते असल्याने सगळीकडे दगड धोंड्याचे साम्राज्य होते. सर्वत्र खाच खळगे होते. त्यामधून मार्ग काढताना कसरत होत होती. किती वेळा पायाला ठेच लागली असेल याची गणती करता येणार नाही. त्याचा परिणाम पायावर झालाच. ठेच लागून, घर्षणाने पायाला फोड आले. कोणतेही यश मिळवताना संघर्ष करावाच लागतो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. (No gain without pain.) याचा प्रत्यय वेळोवेळी आम्हास आला. 

                   या स्पर्धेत देशातील तसेच जगातील आंतरराष्ट्रीय धावपटूही सहभागी झाले होते.अल्ट्रा रनर्सनी आपले अंतर वेगवेगळ्या टप्प्यांत पार केले. या प्रत्येक टप्प्यात स्पर्धकांना बक्षीसे जिंकण्याची संधी होती. ''सशक्त शरीरात सशक्त मन असते (Sound mind in a sound body), या म्हणीप्रमाणे आपल्या प्रत्येकाने शारीरिक आरोग्याचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. ही मुख्य भूमिका या उपक्रमामागे आहे. 

                    सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडीचे विलासराव शिंदे अध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.त्यांची ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्राला रोल मॉडेल आहे. प्रत्येक गावातील शेतकरी एकत्र आले, त्यांनी गटशेती केली, फार्मर प्रोडूसर कंपनी स्थापन केली तर महाराष्ट्राचे कृषी विषयक चित्र बदलण्यासाठी वेळ लागणार नाही असे वाटते. सह्याद्री फार्मचे काम खूपच मोठे आहे.

 सह्याद्री कंपनी विषयी थोडेसे:

 सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनीचा विस्तार १२० एकरावर आहे. हा खरेतर फळप्रक्रिया उद्योग आहे. येथे स्ट्रॉबेरी, पेरु, अंजीर, द्राक्षे, आंबा या फळपिकावर प्रक्रिया केली जाते. येथून दररोज १५ ते १६ कंटेनर जगातील ४२ देशात जातात. निर्यातक्षम उत्पादन असल्याने लोकांचा आर्थिक  स्तर उंचावला आहे. शेत शिवारात सर्वत्र टोलेजंग बंगले पाहायला मिळत होते. एखादी व्यक्ती कल्पक विचाराची असेल तर जिल्ह्याचे चित्र कसे बदलते हे पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले. मला सह्याद्री फार्ममध्ये अतिशय प्रतिष्ठेची वागणूक दिली हे मी आयुष्यभर विसरु शकत नाही.

                 मला १०० किलोमीटरच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेक अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागली. १०० किलोमीटर स्पर्धेत भाग घेण्याची तीव्र इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. काही वेळा यशाला हुलकावणी मिळाली होती. बऱ्याच दिवसापासून याची तयारी चालू होती. आज मी यशस्वी झालो याचा आनंद मला होत आहे. १०० किलोमीटर शर्यंत जिंकल्याचा दिवस अविस्मरणीय असाच आहे. हे यश माझ्या एकट्याचे नसुन बऱ्याच दृश्य, अदृश्य शक्ती माझ्या पाठीमागे असल्याने हे यश मिळाले आहे असे मला वाटते. 

                 सध्या मी शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई या संस्थेचा संचालक आहे. या संस्थेचे भरीव पाठबळ माझ्यामागे आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. गोरख चव्हाण तसेच संस्थापक उपाध्यक्ष मा. चंद्रकांत वंजारी आणि सर्व संचालक मंडळ तसेच माझे कुटुंबीय यांच्या सहकार्यामुळे मला हे यश गाठता आले त्यांच्या ऋणात राहणेच मला आवडेल.

         आपणास निरोगी आयुष्य हवे असेल व्यायामाशिवाय पर्याय नाही. आपण प्रत्येकानेच व्यायाम करावा तसेच  स्वतःला आरोग्य संपन्न ठेवावे असे वाटते.

    राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

    ८३६९४३१३०६

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...