रविवार, २६ मार्च, २०२३

वयाच्या ६४ व्या वर्षी पहिला क्रमांक २१ किलोमीटर !! शहीद मॅरेथॉन सांगली !! (२६ मार्च )

 !! शहीद मॅरेथॉन सांगली !! (२६ मार्च )

          


 सांगलीची शहीद मॅरेथॉन ही शहिदांना अभिवादन करणारी भारतातील एकमेव मॅरेथॉन होय. स्व.अशोक कामटे एडीशनल पोलीस कमिशनर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या मरेथॉनचे आयोजन करण्यात येते. सांगली येथे ५ किलोमीटरची  फन रन व २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.



         मी २१ किलोमीटरमध्ये सहभाग घेतला होता.आज मी ही स्पर्धा  १.४३.५२(एक तास त्रेचाळीस मिनिटे आणि बावन्न सेकंदात ) पूर्ण केली. ६० वर्षावरील  वयोगटात माझा पहिला क्रमांक आला.



      आयुष्यातील सर्वात कमी वेळात पूर्ण केलेली ही हाफ मॅरेथॉन ठरली, त्यामुळे आजचा आनंद अवर्णनीय आहे. माझ्यासह स्वास्थम फिटनेस क्लबचे मच्छिन्द्र फडतरे, दीपक राजे, आनंदराव जाधव, डॉ. दयानंद घाडगे, संतोष कणसे , संदीप शिंदे, डॉ.अमोल पवार, डॉ. अतुल लिपारे, अविनाश सुतार यांच्यासह अनेक धावपट्टूनी  या स्पर्धेत भाग  घेतला होता. प्रचंड ऊर्जा स्रोत असणारे माझे स्नेही विशाल घोरपडे मला प्रेरणा देण्यासाठी  खास आले होते. आज दोघे एकत्रच धावलो. आज कमीतकमी वेळात शर्यत पूर्ण करण्याचे श्रेय विशाल घोरपडे यांनाच जाते.



         आजचा शर्यतीचा बराचसा मार्ग सपाट असल्याने धावण्याचा जोश वेगळाच होता. मार्गावर कृष्णा नदीवर ब्रिटिशकालीन आयर्वीन पूल, गणपती मंदिर अशी ऐतिहासिक ठिकाणे होती. रुट सपोर्ट अतिशय उत्साहवर्धक होता. राज्यातील स्पर्धकांबरोबर सांगलीमधील आबालवृद्धांनीही यामध्ये  मोठ्या संख्येने भाग घेतला होता.मार्गावरील वाद्य वृंद स्पर्धकांच्यामध्ये जोश निर्माण करत होता.

         ही स्पर्धा सकाळी ५:४५ ला  सुनील पवार आयुक्त सांगली -मिरज- कुपवाड  महानगरपालिका ,मा.बापू बांगर जिल्हा पोलीस उपअधीक्षक सातारा  यांच्यासह अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते फ्लॅग ऑफ करून सुरु झाली .फ्लॅग ऑफ करण्यापूर्वी राष्ट्रगीत "जनगणमन" झाले. राष्ट्रगीताने वातावरण राष्ट्रभक्तीमय झाले होते. सर्वत्र "भारत माता की जय " चा नारा घुमला होता.

  नियमित सराव, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यश खेचून आणता येते हेच आजच्या मॅरेथॉनने दाखवून दिले. आपण एखाद्या क्षेत्रात यशोशिखरावर पोहचण्या साठी आवश्यक तो सराव करावा. आपण इच्छाशक्तीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावीत असे मला वाटते.

        राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

बुधवार, १५ मार्च, २०२३

डी. एड कॉलेजच्या क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ

 डी. एड कॉलेजच्या क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ


      जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण, जि. सातारा आणि सातारा जिल्हा अध्यापक विद्यालय समन्वय समिती सातारा  यांच्यावतीने दिनांक १४ मार्च  रोजी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांतील विविधांगी क्रीडा स्पर्धांचे आयोजन क्रांतिस्मृती ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्यूकेशनच्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ सातारा हिल मॅरेथॉनचे आयोजक, लेखक,आयर्नमॅन डॉ. संदीप काटे आणि  शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माया मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता.

       याच दिवशी सायंकाळी ६ वाजता बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमालाप्रमुख पाहुणे म्हणून जायची संधी मला मिळाली. माझ्याबरोबर साताऱ्यातील ख्यातनाम वैद्य आणि आहारतज्ञ दयानंद घाडगे होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खेळांचे महत्व, त्यापासून होणारे फायदे,आपल्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली. आमच्या हस्ते विविध खेळात प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा प्रशस्तीपत्र व पदके देऊन सन्मान करण्यात आला.






    "Sound mind in Sound body"

निरोगी जीवनातच निरोगी मन असते. या म्हणीप्रमाणे आपण निरोगी राहण्यासाठी आपल्या आवडीच्या खेळात स्वतःला गुंतवून घ्यायला हवे तरच आरोग्यविषयक संपत्ती आपणास मिळेल असे मला वाटते.

      राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...