रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

Tata Ultra Marathon 2023

 !!टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, लोणावळा !!  (२६ फेब्रुवारी )



   आज टाटा अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन लोणावळा येथे करण्यात आले होते. या स्पर्धा ३५ कि. मी.व ५० कि. मी.अशा होत्या. यावेळी मी ५० कि. मी.अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मार्गात फार मोठा चढ उतार असेल तर त्याला अल्ट्रा असे म्हटले जाते. आपल्याकडील सातारा हिल मॅरेथॉन त्याच प्रकारची आहे.

      ही स्पर्धा रात्री १:३० वाजता सुरु झाली. स्पर्धेपूर्वी एक तासभर स्टारटिंग पॉईन्टला हजर राहावे लागते. नियोजनाप्रमाणे ही स्पर्धा सुरु झाली. स्पर्धा सुरु करताना फ्लॅग ऑफ करतात हे आपणास विदित आहेच. स्पर्धा कमीतकमी वेळेत पूर्ण करायची असा मनोदय आम्ही केला होता.तो आम्ही तडीस नेला. मी ही स्पर्धा ५:१४:४९ ( पाच तास चौदा मिनिटे आणि एकोणपन्नास सेकंदात ) पूर्ण केली. माझं आतापर्यंतचे हे बेस्ट रेकॉर्ड आहे. कोणतीही स्पर्धा पूर्ण करताना अनेकांचे सहकार्य लाभते.



 माझ्याकडून विक्रमी वेळात स्पर्धा पूर्ण करुन घेण्याचे सर्व श्रेय मंगळापूरचे विशाल घोरपडे यांनाच जाते.त्यांनी सराव तर करुन घेतलाच. त्यांनी स्पर्धेत भाग घेतला नव्हता. केवळ माझ्या प्रेमापोटी स्वतःच्या पायाला दुखापत असताना ते माझ्याबरोबर धावले.मला वारंवार स्पर्धेच्या टिप्स दिल्या. चढाला धावताना मदतीचा हात दिला. तरूणांना लाजवेल असेच आमच्याकडून काम झाल्याने कौतुकाचा वर्षाव आमच्यावर होत होता.

          स्पर्धेचा मार्ग खडतर होता हे वेगळे सांगायला नकोच. स्पर्धा मार्गावर २४१२ मीटर उंचीचा चढ उतार होता. त्याला Elevation gain & loss  असे म्हटले जाते. थोडक्यात आम्ही २४१२ मीटर उंचीचा चढ उतार धावलो. वेळ रात्रीची होती. प्रत्येकाच्या डोक्यावर बॅटरी होती.ठीकठिकाणी जनरेटरच्या माध्यमातून विजेची सोय केली होती. हा स्पर्धा प्रकार अवघड आहे. मलाही ३१ व्या किलोमीटरला उजव्या पायाला जबरदस्त Cramp आला. आम्हाला जागेवर थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.








पण विशालजीने पाय चोळला आणि आम्ही तंदुरुस्त होऊन धावायला सुरुवात केली. आज माझेबरोबर विशाल घोरपडे नसते तर मला ही स्पर्धा अर्ध्यात सोडून द्यावी लागली असती.  त्यामुळे आजच्या यशाचे सर्व श्रेय विशाल घोरपडे यांनाच जाते. आजचं यश मी त्यांनाच समर्पित करतो.

       टाटांची प्रत्येक स्पर्धा अफलातून असते. रुट सपोर्ट खूपच छान होता. ठराविक अंतरावर इनर्जी फुडचे पॉईंट होते. मेडिकल हेल्पही लगेच मिळत होती. पुणे परिसरातील स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी  पिंपरी चिंचवड येथील सीएफसी क्लबचे सहकार्य  नेहमीच मला होते.या क्लबमधील माझे बंधू डॉ.दत्तात्रय भोसले, गुणवंत गायकवाड, रामदास लावंड, सुनिल मांढरे,निलेश भालेकर, अशोक कोचळे,सी. बी.मगर, ओंकार पाटील,दिपाली देवरे पाटील  हे सदस्य सहभागी झाले होते.

      कोणतंच यश सहजपणे मिळत नाही त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी असावी लागते. आपणास जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सातत्यपूर्ण कष्ट करावेच लागणार. आपणही कष्ट करण्याची तयारी ठेऊन जीवनात यशस्वी व्हावे असे मला वाटते.

      राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...