शुक्रवार, ३१ जुलै, २०२०


!! लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी !! (१ऑगस्ट )


        ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त..
          टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी  जिल्ह्यातील  चिखलगांवी झाला. स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते. पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र १९ व्या वर्षी निवर्तले. १६ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्याने टिळकांचे लग्न १७ व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. १८७६ साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित विषय घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली.
              महाविद्यालयामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राशी मैत्री जमली. दोघेही वैचारिक चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य मिळाले
पाहिजे. आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले ‘जोडणारे तोडणारे’ पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित. दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच २ जानेवारी १८८० ला पुन्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली.
            टिळक-आगरकर यांच्यासमवेत तिसरे सहकारी चिपळूणकर मिळाले व लोकशिक्षण प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करण्याचे ठरले. ‘केसरी’ मधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केलेने  हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नावर आगरकर लिहू लागले. आधी सामाजिक की आधी राजकीय यावर आगरकर आधी सामाजिक तर टिळक आधी राजकीय असे विचार पर्यायाने मतभेद होऊ लागले. टिळक म्हणायचे सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. यातूनच मतभेद विकोपाला गेला व आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडले. आगरकरांनी सामाजिक प्रश्नासाठी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यातून टिळकांकडे केसरीचे संपादकत्व आले. टिळकांनी शैक्षणिक संस्थांचा राजीनामा दिला व पूर्णवेळ केसरीकडे दिला. अल्पावधीत ‘केसरी’ प्रसिद्धीस आला.
                  टिळकांनी गणपती उत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. ते एक लोकशिक्षणाचे प्रभावी व्यासपीठ निर्माण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रात अनेक गावी सार्वजनिक गणपती उत्सव त्या अनुषंगाने व्याख्याने, मेळे, लेझीम, पथके आदींमुळे लोक एकत्रित येऊ लागले. त्यापुढे जाऊन ‘शिवजयंती’ सार्वजनिक स्वरूपात सुरू केली. हे महत्त्वाचे पाऊल टिळकांनी उचलले. आपली भूमिका या उत्सवाच्या रूपाने केसरीतून व्यक्त केली. ‘राष्ट्रपुरूषाचे स्मरण’ व त्यातून कृतज्ञता व्यक्त करणे. महापुरूषाचे चरित्र सर्वसामान्यार्पंत पोहोचवणे हा असा हेतू स्पष्ट केला. १८७६-७७ साली पडलेल्या दुष्काळानंतर सरकारने ‘फॅमिन रिलिफ कोड’ पास केला. त्याचे मराठी भाषांतर पुस्तिका रूपाने प्रसिद्ध केले. ‘कर्ज काढून सारा भरू नका’ असे सांगितले गेले. यामुळे  ठाणे-कुलाबा येथील कार्यकर्त्यांवर खटले भरले गेले. कायद्याच्या  चौकटीत राहून सरकारवर दबाव आणणे हे कार्य टिळकांनी प्रभावीपणे केले. पुण्यात १८९७ मध्ये प्लेगची आपत्ती आली. सरकारने रँड या अधिकार्‍याची नेमणूक केली. पण हा अधिकारी म्हणजे कर्दन काळ ठरला. रँडचा खून चाफेकर बंधूंनी केला. टिळकांनी अग्रलेख लिहिला. ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ याबद्दल टिळकांना १८ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
                १९०७ मध्ये सुरतला काँग्रेसचे अधिवेशन झाले. तिथे जहाल व मवाळ गट असे होऊन अधिवेशन उधळले गेले. टिळकांनी तरुणांना साहसी कृत्ये  करण्याची, किंग्ज फोर्डला धडा शिकविण्याचा सल्ला दिला. पुढे पां. म. बापट यांचे  बॉम्बचे मॅनुअल बंगालमधील तरुणांना मिळाले. त्याचे पडसाद उमटले. शेवटी टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन टिळकांना ६ वर्षे ब्रह्मदेशातील मंडाले येथे नेले. टिळकांनी कारागृहात रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे वाचन केले व ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ केवळ चार महिन्यांत पूर्ण केला.
मंडाले येथून सुटल्यावर ‘पुनश्च हरी ओम्’ ची गर्जना करून टिळकांनी कार्य सुरू केले. लखनौ करार घडवून हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. अशा जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबई येथील सरदारगृहात प्राणज्योत मालवली.
     लोकमान्य टिळकांना भावपूर्ण आदरांजली
संग्राहक --राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

बुधवार, २९ जुलै, २०२०

!! सोनू निगम जन्मदिन !!(३० जुलै )

!! सोनू निगम जन्मदिन !!(३० जुलै )
       सोनू निगम जन्म -- ३० जुलै १९७३  एक भारतीय गायक आणि संगीतकार आहेत. त्यांचा  जन्म फरीदाबाद, हरियाणा येथे झाला.  सर्वोत्तम गायक म्हणून ते  ओळखले जातात. त्यांनी मुख्यत: हिंदी आणि कन्नड भाषेच्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत परंतु इंग्रजी, बंगाली, ओडिया, गुजराती, तामिळ , तेलगू , मराठी, नेपाळी, मैथिली, मल्याळम आणि इतर भारतीय भाषांमध्येही  गाणी गायली आहेत. निगमने अनेक भारतीय पॉप अल्बम देखील  केले आहेत आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ते "जीवांचा प्रभु" म्हणून ओळखले जातात.
 वयाच्या चौथ्यावर्षी निगमने गायनाच्या कारकीर्दीला सुरुवात केली.
सोनू निगम यांना प्राप्त झालेले काही पुरस्कार
१) प्राश्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते
२) राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, दक्षिण आफ्रिकेचा फिल्मफेअर पुरस्कार
३) हरियाणा गौरव पुरस्कार
४) मिर्ची संगीत पुरस्कार
५) लायन्स सुवर्ण पुरस्कार
६) उत्कृष्ट कन्नड गायक पुरस्कार
७) ग्लोबल इंडियन म्युझिक अवॉर्ड
८) इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड
९) आयफा सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक
  पुरस्कार
१०) झी सिने अवॉर्ड बेस्ट प्लेबॅक सिंगर
    संग्राहक -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

(सोनू निगम यांनी गायलेले "बॉर्डर" चित्रपटातील गाणे ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. आपण गाण्याचा आनंद लुटावा.)
https://www.youtube.com/watch?v=NXZr9exURTg

!!कु. पल्लवी पवारची तंत्र अधिकारीपदी निवड !!

!!कु. पल्लवी पवारची तंत्र अधिकारीपदी निवड  !!


      वर्णे  येथील श्री काळभैरव विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.पल्लवी प्रभाकर पवार हिची भारतीय खाद्य निगममध्ये (Food Corporation Of India) तंत्र अधिकारीपदी निवड झालेली आहे. या निवडीमुळे पल्लवी हिस केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होता येणार आहे. 
       पल्लवीने प्राथमिक, माध्यमिक शिक्षण वर्णे येथे, उच्च माध्यमिक शिक्षण खंडाळा येथे तर बी.एस.सी. ( ऍग्री ) चे शिक्षण कोल्हापूर येथून पूर्ण केले.सन.२०१७ ला पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सतत दोन वर्षे चिकाटीने अभ्यास करून तिने हे पद मिळवले आहे. तिने आपले शिक्षण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. तिच्या यशामुळे काळभैरव विद्यालयाचे नाव उंचावले आहे. तिच्या यशात आई तसेच चुलतीचा, मोठया बहिणीचा, बंधूंचा मोठा वाटा आहे. तिच्या यशाबद्दल गावच्या सर्व सामाजिक संस्थानी विशेषतः वर्णे ग्रामविकास मंडळ, श्री काळभैरव विद्यालय, ग्रामपंचायत, सेवा सोसायट्या,देवस्थान ट्रस्ट आदि पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.                                                             
शब्दांकन - राजेंद्र पवार, 
मोबा- ९८५०७८११७८

मंगळवार, २८ जुलै, २०२०

!! जागतिक व्याघ्र दिन !! (२९ जुलै )

!! जागतिक व्याघ्र दिन !! (२९ जुलै )
         जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
               या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.
          विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात सुमारे १,००,००० वाघ होते, सध्या ही सध्या सुमारे ३०६२ ते ३९४८ इतकी असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत.
           सरकारी पातळीवरून जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतले जातात. तसेच व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सुद्धा या निमित्ताने जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात. भारतात अनेक ठिकाणी व्याघ्रप्रकल्प आहेत.महाराष्ट्रातही ताडोबा, मेळघाट,  पेंच ,सह्याद्री, नवेगाव असे व्याघ्रप्रकल्प आहेत. वाघांचे संरक्षण, संवर्धन करणेसाठी समाजात जागृती करुया.
    संग्राहक -- राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८








रविवार, २६ जुलै, २०२०

!! ए.पी.जे. अब्दुल कलाम  स्मृतिदिन !!(२७ जुलै )
         डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे झाला होता. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍.सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.


            १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
        विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पदमविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
        अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
      ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
   डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन.
  संग्राहक -- राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

!! कारगिल विजय दिन !!(२६ जुलै )

!! कारगिल विजय दिन !!(२६ जुलै )
दरवर्षी २६ जुलै हा कारगिल युद्धाच्या नायकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.कारगिल विजय दिवस हा स्वतंत्र भारतासाठी महत्वाचा दिवस आहे . दरवर्षी २६ जुलै रोजी हा उत्सव साजरा केला जातो. कारगिल युद्ध सुमारे ६० दिवस चालले आणि २६ जुलै रोजी संपले. यामध्ये भारताचा विजय झाला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतरही अनेक सैन्य संघर्ष सुरूच होते. दोन्ही देशांच्या आण्विक चाचण्यांमुळे तणाव आणखी वाढला होता. परिस्थिती शांत करण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोरमध्ये एका घोषणेवर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारे शांततेने सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण पाकिस्तानने आपले सैन्य आणि निमलष्करी दले लपवून ठेवली आणि त्यांना नियंत्रण रेषा ओलांडून पाठवले आणि या घुसखोरीला “ऑपरेशन बद्र” असे नाव दिले. काश्मीर आणि लडाखमधील संबंध तोडणे आणि सियाचीन ग्लेशियरपासून भारतीय सैन्य हटविणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट होते. पाकिस्तानला असा विश्वास आहे की या प्रदेशात कोणत्याही प्रकारचे तणाव काश्मीरच्या समस्येस आंतरराष्ट्रीय मुद्दा बनविण्यात मदत करेल. सुरुवातीला ही एक घुसखोरी मानली जात होती आणि दावा केला जात होता की ते काही दिवसांत काढून टाकले जातील. पण नियंत्रण रेषेत शोध घेतल्यानंतर आणि या घुसखोरांनी राबविलेल्या युक्तींमध्ये मतभेद झाल्यावर भारतीय सैन्याला समजले की हा हल्ला अत्यंत मोठ्या प्रमाणावर आखण्यात आला होता. यानंतर भारत सरकारने ऑपरेशन विजय या नावाने २००,००० सैनिक पाठविले. २६ जुलै १९९९ रोजी अधिकृतपणे युद्ध संपले. या युद्धादरम्यान ५२७ सैनिकांनी आपले बलिदान दिले.अनेक सैनिक जखमी झाले. आमच्याच गावातील योगेश पवार व शेजारच्या अपशिंगे (मि.)गावातील आनंद सूर्यवंशी हे या युध्दात जखमी झाले होते.
योगेश पवार

आनंद सूर्यवंशी 


या वीर जवानांशी चर्चा करताना भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरीचा पटच त्यांनी उलघडून दाखविला. आम्हाला आजजरी देशसेवेसाठी बोलावले तर आम्ही जायला तयार आहोत असे त्यांनी सांगितले. आम्हाला ऑपरेशन विजय मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. योगेश पवार आणि आनंद सूर्यवंशी यांना कारगिल म्हणूनच परिसरात ओळखले जाते. आनंद सूर्यवंशीनी तर आपल्या घराला "कारगिल" असे नाव दिले आहे. कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांना विनम्र अभिवादन. संग्राहक -- राजेंद्र पवार ९८५०७८११७८

!!नागपंचमी !! (२५ जुलै )


!!नागपंचमी !! (२५ जुलै )

!!नागपंचमी !! (२५ जुलै ) श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. 'भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो', हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. या विषयीची कथा खालीलप्रमाणे... नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. त्यापेकी एक कथा..सत्येश्वरी नावाची एक देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.. तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. नागपंचमी सणाच्या निमित्ताने समस्त महिला वर्गाला हार्दिक शुभेच्छा. संग्राहक -- राजेंद्र पवार ९८५०७८११७८

रविवार, १२ जुलै, २०२०

!! जागतिक युवा कौशल्य दिन !! (१५ जुलै )

!!  जागतिक युवा कौशल्य दिन !! (१५ जुलै )



       !!  जागतिक युवा कौशल्य दिन !! (१५ जुलै )
       कौशल्य शिक्षणाला भविष्यात महत्व येणार हे ओळखून सन २०१३-१४ पासूनच वर्णे येथील श्री काळभैरव विद्यालयात  मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा विषय सुरु करण्यात आला. आता हा विषय एम. एस.एफ.सी. या नावाने ओळखला जातो.२०१४ मध्ये केंद्रात सत्ताबदल झाला. नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेत आले. त्यांनी कौशल्य विकासास पोषक असे निर्णय घेतले. आता १५ जुलै हा दिवस सन २०१५ पासून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. नोव्हेंबर २०१४ मध्येच संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने तसा ठराव मंजूर केला.आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्याचा संकल्प केला.
       देशातील तरुणांना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये आय. टी. आय;कृषीतंत्र विद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे. आगामी काळात प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळावे यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध आहे.
         बेरोजगारी समस्येमागचे मुख्य कारण अकुशलता हे आहे. रोजगाराची निर्मिती कौशल्यावर आधारित आहे. कौशल्य आहे त्यांनाच नोकरी वा काम मिळणार आहे.
अशाचप्रकारे कौशल्य शिक्षणाचे महत्त्व जाणून  कौशल्याधारित युवा पिढी  निर्माण करण्यासाठी वर्णे येथील  विद्यालयात कौशल्य शिक्षण  देण्याची सोय अगोदरच केलेली आहे. या विद्यालयात एम.एस.एफ.सी.(मल्टीकल स्किल फौंडेशन कोर्स ) हा अभ्यासक्रम ९वी,१० वीला शिकवला जातो. या विषयाचा दहावीला १०० गुणांचा पेपर आहे.याविषयांतर्गत चार उपविषय आहेत.१)अभियांत्रिकी.२) ऊर्जा- पर्यावरण.३) शेती- पशुपालन.४)गृह आरोग्य.
      या विषयाचे फायदे--
१)आय.टी. आय.साठी २५% जागा राखीव.
२)अभियांत्रिकीसाठी १५% जागा राखीव.
३) एम.सी.व्ही.सी.(Minimum Competency Vocational Course ) ला
  ४०% जागा राखीव.
४) स्वयंरोजगार करता येतो.
            सद्या राज्यात उद्योगाला चालना देण्याचे काम चालू आहे. स्किल इंडिया, स्टार्टअपसारख्या योजना आहेत. याचा फायदा घेतला पाहिजे. हा फायदा घेण्यासाठी पायाभूत शिक्षण असणे गरजेचे आहे. आणि असे शिक्षण मिळण्याची सुविधा वर्णेसारख्या गावात उपलब्ध असल्याचा मला अभिमान वाटतो. कौशल्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी लेंड अ हँड इंडिया या स्वयंसेवी सामाजिक संस्था  तसेच साताऱ्यातील उद्योजक तथा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पवार यांचे योगदान मोठे आहे त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. लेंड अ हँड इंडिया ही संस्था देशभर कौशल्य शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संस्थेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील  अनेक शाळांना कौशल्यशिक्षण उपक्रम शाळापातळीवर राबवण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य केले जात आहे. लाही संस्थेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात कौशल्य शिक्षण देण्याचे कार्य अतिशय जोमाने सुरु आहे.
       कौशल्य शिक्षण मिळण्यासाठी  वर्णे येथील माध्यमिक विद्यालयात आपण शिक्षण घेतले तर भविष्यात रोजगाराचा प्रश्नच येणार नाही.चला तर चांगले भविष्य घडवण्यासाठी स्थानिक शाळेतच प्रवेश घेऊया.देशाला  कौशल्यपूर्ण मनुष्यबळ देऊया.
आणि या वर्षीचा जागतिक युवा कौशल्य दिवस हा गाव पातळीवर तसेच  कौटुंबिक पातळीवर उत्साहाने साजरा करुया.कौशल्य शिक्षणाचा वसा घेवूया आणि याचा प्रचार आणि प्रसार करुया.आणि आपला विकास साधूया.🙏🏻
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

बुधवार, ८ जुलै, २०२०

!! वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित!! (९ जुलै )

!!  वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित!! (९ जुलै )
 ९ जुलै १९६९ या दिवशी वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले.
        वाघांविषयी माहिती
वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो.
          दिवसेदिवस वाघाची संख्या घटत आहे.
वाघांची संख्या घटण्याची कारणे--
१)निवासस्थान नष्ट करणे.
२) निवासस्थान खंडित करणे .
३) शिकार करणे.
      वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ मांचूरिया चीन, आग्नेय अशियातून भारतात आला असे मानले जाते. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होते परंतु शिकार व वसतिस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाले. जंगली वाघ हा आज प्रामुख्याने भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया या देशांत आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर पोहोचले आहेत व ते वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहेत. वाघ हा शिकार करून खातो. हा आशिया, मुख्यतः भारत, भूतान, चीन, कोरिया आणि साइबेरियन रशियामध्ये राहतो. जंगली वाघांतील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत.
वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाब, हरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे.
     भारतातील वाघांच्या आढळाचे पाच उपविभाग
१)हिमालय व तराई विभाग - यात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, उत्तरप्रदेश, बिहार, सिक्कीम, आसाम अरुणाचल प्रदेश व इशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयाच्या तराई जंगलांमध्ये वाघांचे वसतीस्थान आहे.
२)अरवली पर्वताच्या पूर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे. यांत रणथंभोर सरिस्का सारखी राष्ट्रीय उद्याने येतात.
३)सुंदरबन व ओडिशा .
४)मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व आढळते. यात कान्हा, बांधवगड, मेळघाट, ताडोबा यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये येतात.
५)सह्याद्री व मलबार किनारा यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दक्षिण भाग येतो. बंदीपूर, मदुमलाई पेरियार इत्यादी. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे.
         वाघाचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात असते. वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतिस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबन मधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले. (उदा: महाराष्ट्रातील सह्याद्री व कोकणातील जंगले)
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार,भारतात वाघांची संख्या वाढली असून ती आता २२२६ झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, मध्य भारतातील, ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे ७१८ वाघ असल्याचे यात दृष्टीपथात आले.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.
           वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. सायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरीयन वाघ हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. सुमात्रा मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणासाचे ठसे वेगळे असतात त्याच प्रमाणे. यावरून वाघांना ओळखता येते. परंतु जंगली वाघ दिसायला मिळणे ही दुर्मिळ घटना असते त्यामुळे ही पद्धत अजूनही ग्राह्य धरलेली नाही. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सदृश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते  वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुंबून स्वता:ला थंड ठेवतात.
          वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमानवाढीने दिसतच आहेत.
 वाघाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपल्याजवळ सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे तेथे भेट देऊन वाघांविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
 फोटो सौजन्य-- मंगेश ताटे, रेंज फॉरेस्ट ऑफीसर, पेंच व्याघ्र प्रकल्प .
        संग्राहक -- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८







गुरुवार, २ जुलै, २०२०

!! वर्णे कीर्तनसेवा !!


    !! वर्णे कीर्तनसेवा !! 


     आषाढी एकादशी निमित्ताने वर्णे येथे ह.भ. प.सुजित काळंगे यांचे कीर्तन ग्रामस्थांनी आयोजित केले होते. त्यांनी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग कीर्तन सेवेसाठी घेतला होता.
आपुलिया हिता जो असे जागता।धन्य माता पिता तयाचिये ।१।कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक।तयाचा हरिख वाटे देवा।२। गीता भागवत करिती श्रवण।अखंड चिंतन विठोबाचे।३।तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा।तरी माझ्या दैवा पार नाही।४।
      अभंगाचे निरुपण महाराजांनी सुंदररितीने केले.प्रत्येकाला आपले हित कशात आहे ते प्रथम समजले पाहिजे.
  हित ही संकल्पना स्थळ, काळ वेळपरत्वे बदलत असते. उदाहरण द्यायचे झाले तर लहानपणी मुलाची योग्य वाढ  होणे,नंतर शालेय शिक्षण, नोकरी व्यवसाय यामध्ये स्थिर झाला की  विवाहाची गडबड  आता नातवंडे पाहण्याची घाई आई वडील यांना झालेली असते.आई वडीलांचे हित मुलांच्या हितात दडलेले असते.आपली मुलं सुसंस्कारित असतील तर माता पिता आनंदी असतात.संस्कारानंतर सात्विकपणा येत असतो. सुसंस्कारित मुलं घडण्यासाठी राजमाता जिजाऊ, साने गुरुजींची "श्यामची आई"ही उदाहरणे दिली.  उदाहरणार्थ , "बाळा पायाला घाण लागू नये यासाठी जपतोस तसेच मनाला घाण लागू नये यासाठी जपहो."मुलं चांगली घडणं हे घरातील वातावरनावर अवलंबून असते.
      गीता  भागवत याबाबत विवेचन करताना ते म्हणाले की,गीता माणसाला कसे जगायचे ते शिकवते. तुकाराम महाराजांनी आई वडिलांची सेवा मुलांच्याकडून उत्तम घडावी असेच अपेक्षिले आहे. ज्यांना आई वडील कळाले त्यांनाच "विठ्ठल रुखमाई" कळले. कोणत्याही परिस्थितीत आपल्या माता पित्याना वृध्दाश्रमात जाण्याची वेळ येऊ नये  असे वातावरण घरात निर्माण झाले पाहिजे. सुजित महाराज काळंगे यांचे गावात आजचे पहिलेच कीर्तन होते त्यानिमित्ताने त्यांनी संकल्प केला की, समाजातील गरजूना भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आपल्या गावात "आधाराश्रम" उभारला जाईल. ही संकल्पना ऐकून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.
           थोडक्यात आजच्या कीर्तनातून आपली मुलं सुसंस्कारित, सात्विक असतील तर ते कुटुंब, तो समाज प्रगतीपथावर जाण्यात कोणतीही अडचण नाही. यामध्ये पालकांची भूमिकादेखील महत्वाची आहे. सुजाण पालकत्वच चांगल्या समाजमिर्मितीसाठी आवश्यक आहे.चला तर आपण  आदर्श समाजनिर्मितीसाठी सर्वजणच सजग होऊया.
   शब्दांकन -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...