गुरुवार, २५ जून, २०२०

!! वैदीक हर्बल फार्माला भेट !!

       !! वैदीक हर्बल फार्माला भेट !!



           सातारा जिल्ह्यातील अतीत येथील मा. प्रकाश पवार यांनी आपल्या गावाशेजारीच निसराळे फाट्यावर वैदिक हर्बल फार्मा ही कंपनी १० वर्षांपूर्वी सुरु केली आहे. या कंपनीमध्ये सर्व आयुर्वेदिक उत्पादने घेतली जातात. आपल्याच परिसरात उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पतींची आपल्याला ओळख नाही. किंबहूना त्याचे महत्व आपणास माहीत नसते. आज त्यांच्याकडून अनेक दुर्मिळ वनस्पतींची माहिती मिळाली. कृषितज्ञ व आमची माती आमची माणसे, कृषिदर्शन, तंत्र नव्या शेतीचे या सारख्या शेतीविषयक मालिकांचे निर्माते मा. मानसिंग पवार यांच्यामुळे या प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला.
          प्रकाश पवार हे स्वतः एम. ई. प्रोडक्शन आहेत. ते वेगवेगळ्या औषधी वनस्पतीवर संशोधन करत आहेत. त्यांच्याकडे भाजीपाला, फळे पिकासाठी नुट्रीप्लस, आरोग्यासाठी हेल्थ प्लस, दूध वाढीसाठी बायो मिल्क प्लस, पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी बायो प्लॅन्ट ग्रोथ, कीटक नियंत्रणासाठी बायो कीटकनाशक, जमिनीची सुपीकता वाढीसाठी बायो भू सुधारक अशी उत्पादने घेतली जात आहेत. शतावरी कल्प बनवण्याचे कामदेखील मोठ्या प्रमाणावर चाललेले दिसून आले.
             मूल्यवर्धन करण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सेंद्रीय उत्पादन घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट दिसून आले. शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी जैविक उत्पादने वापरावीत असे वाटते.
  शब्दांकन -- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

सोमवार, २२ जून, २०२०

!! श्री काळभैरव विद्यालयाचा ३७ वा वर्धापनदिन !!

!! श्री काळभैरव विद्यालयाचा ३७ वा वर्धापनदिन !!
     (२३ जून)

        वर्णे ग्रामविकास मंडळ, मुंबई या स्थानिक संस्थेद्वारा आपल्या गावचे विद्यालय चालवले जाते. आजच्याच दिवशी म्हणजे २३ जून १९८३ रोजी आपले विद्यालय सुरु करण्यात आले. आज भौतिक सुधारणा खूप झाल्या आहेत परंतु १९८३ पूर्वीची परिस्थिती खूपच बिकट होती. दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. मुलींच्या शिक्षणाची अवस्था अतिशय दयनीय होती. सातवीनंतर मुलींचे शिक्षण बंदच होत होते.
            विद्यालय सुरु झाल्याने गावाचा कायापालट झाला. मुलामुलींनी उच्च शिक्षण घेतले. आज समाजाच्या सर्वच क्षेत्रात मुलं मुली काम करत असल्याचा आनंद होत आहे. विशेषतः क्रीडा क्षेत्रात विद्यालयाने राज्यस्तरापर्यंत मजल मारली. वैयक्तीक क्रीडाप्रकारात मल्लखांबमध्ये विद्यालय सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. पॉलिहाऊस असणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणूनदेखील आपल्या शाळेचा विशेष गौरव झालेला आहे.



           शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण, प्रशासन, सैन्यदल, नौदल ,कृषी, उद्योग, वैद्यकीय, सहकार अशा विविध क्षेत्रात कार्यरत राहून आपली प्रगती साधली आहे.सध्या शिक्षण क्षेत्रात खूपच बदल होत आहेत. ऑनलाईन शिक्षणप्रणाली येत आहे. आपण बदलाचा स्वीकार केला नाही तर कालबाह्य होऊ.



           बदलत्या काळानुसार आपल्या शिक्षण संस्थेनेदेखील काही बदल स्वीकारले आहेत. मला याठिकाणी तंत्रशिक्षणाचा खास उल्लेख करावा लागेल. सन २०१३-१४ सालापासून  आपल्या विद्यालयात तंत्र शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. अशी सुविधा सातारा जिल्ह्यातील अगदी मोजक्याच शाळांत उपलब्ध आहे. या शिक्षणाचा फायदा, धंदेशिक्षण, अभियांत्रिकी, शेती पशुपालन यासाठी प्रामुख्याने होणार आहे. या शिक्षणाचा लाभ आपल्या मुलांनी घ्यावा असे वाटते. आपल्या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री.संजय बाईंग असून ते संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पवार, कार्याध्यक्ष मानसिंग पवार, सेक्रेटरी राजकुमार काळंगे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये काम करत आहेत. आपण सर्वजणच त्यांना साथ देऊया.
            आपली मुलं स्थानिक शाळेतच शिकवूया. विद्यालयाचे व गावाचे नाव सर्वच बाबतीत आघाडीवर नेऊया. मलाही या शाळेच्या जडणघडणीत सहभागी होता आले याचा विशेष आनंद होत आहे.
        विद्यालय वर्धापनदिनानिमित्त  शालेय विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी,संस्था पदाधिकारी या सर्वांनाच शुभेच्छा.
       शब्दांकन -- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

शुक्रवार, ५ जून, २०२०

!! शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !! (६ जून )


!!  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !!
(६ जून )

            छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.
               त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.
               दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले,  लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतीलआठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्यांनी जलकुंभांनी शिवाजीमहाराजांवर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवाजी महाराज की जय'  च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे
दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच प्रचंड ताकद आहे.ही ताकदच येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.छत्रीय कुलवंतस गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय!
    छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा.
     संग्राहक -- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमा वृक्षारोपण करुन साजरा


!! जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमा वृक्षारोपण करुन साजरा !!





   आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन त्याचबरोबर वटपौर्णिमा हा सण एकत्र आल्याने पर्यावरणप्रेमींनी विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा केला. या दिवसाच्या निमित्ताने वर्णे येथील आबापुरी डोंगरावर ११ वटवृक्षाचे रोपण महिलांसह  विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
             एप्रिल महिन्यातील वसुंधरा दिनापासून अभयवन प्रकल्पातर्गत वर्णे पंचक्रोशीतील अंगापूर, धोंडेवाडी, खोजेवाडी येथील तरुण विशेषतः ज्यांना सैन्यदलात जाऊन देशसेवा करावयाची आहे असे सर्वजण या परिसराचा कायापालट घडवून आणणेसाठी
धडपडत आहेत. याकामी समाजसेवक  लोकसेवा परिवाराचे संस्थापक डॉ. माणिक शेडगे, ऑनररी  कॅप्टन विकास पवार ,श्रीमंत काळंगे,गणेश शेडगे (अंगापूर ),कृष्णत घोरपडे (खोजेवाडी ),पाणी फौंडेशनमध्ये कार्यरत असणारे राहुल काळंगे वर्णे  गावातील सर्व जवान यांचे विशेष योगदान आहे.
             अभयवन प्रकल्पांतर्गत डोंगरावर एकहजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आहे त्यादृष्टीने खड्डे काढून तयार आहेत. या पावसाळ्यात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करुन हा डोंगर हिरवागार करण्याचा संकल्प आहे.आज या उपक्रमाच्या निमित्ताने वर्णे गावचे भूमीपुत्र , चित्रपटनिर्माते मा. मानसिंग पवार म्हणाले की, आता खऱ्याअर्थाने आपण सर्वांनी पर्यावरणावर काम करणे गरजेचे आहे. वृक्षांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण वृक्षाशिवाय जगू शकत नाही. झाडे आपला प्राण आहेत. जन्मापासून अंतापर्यंत झाडं आपल्याला साथ देतात. आपणही झाडांना साथ द्यायला हवी.
            चला तर आपण आपला परिसर हिरवाईने नटण्यासाठी सगळेजणच प्रयत्न करुया. जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमा सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.
     शब्दांकन-- राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

मंगळवार, २ जून, २०२०

!! वटपौर्णिमा आणि वृक्षारोपण !!

!! वटपौर्णिमा आणि वृक्षारोपण !!


           हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
                 निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.
                     ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा.
        सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली, व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले.योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्त्व सांगणारे 'सावित्री' नावाचे महाकाव्य लिहिले आहे.
       वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
         सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया 'मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

अशीही प्रार्थना केली जाते.

सावित्रीच्या विवाहाची कथा
            अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
         सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
                  सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.
   


   
या सणाच्या निमित्ताने  वडाच्या झाडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.बऱ्याचवेळा पूजा करण्यासाठी वडाची फांदीच घरी आणण्याचा वाईट प्रघात रुढ होत आहे अशा गोष्टीना महिलांनीच थारा देऊ नये, नवविवाहित स्त्रियांनी आपणाकडे उपलब्ध असणाऱ्या जागेत वडाचे रोप लावावे, तेच वाढवावे, त्याचीच पूजा करावी.
            ऊर्जा  विभागात मुंबई उपनगर जिल्हा येथे विद्युत निरीक्षक पदावर कार्यरत असणारे मूळचे सातारा जिल्ह्यातील अंगापूर येथील रहिवासी असलेले अशोक कणसे साहेब यांनी यांनी आबापुरीच्या डोंगरावर १९ मे रोजी वडाचे झाड  लावून आपणापुढे आदर्श ठेवला आहे. (कोणास रोपाची आवश्यकता असेल तर आपण  माझेशी संपर्क साधू शकता.) चला तर आपण या सणाच्या निमित्ताने वडाच्या झाडाचे रोप लाऊया, त्याचे संवर्धन करुया आणि पर्यावरण पूरक सण साजरा करुया.
   संग्राहक -- राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...