शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

आमची अंदमान निकोबार सहल दिवस सहावा

!!आमची अंदमान निकोबार सहल !!   (६  )             







                 आज आम्ही सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून तयार झालो. ज्या हॉटेलमध्ये पहिले दोन दिवस व नंतरचे दोन दिवस अंदमान बेटावर मुक्काम केला त्याचे नाव आहे, "My Island Residency". मधले दोन दिवस आम्ही हॅवलॉक बेटावरील "Radha krishna Resort" मध्ये मुक्काम केला होता. दोन्हीही हॉटेलचे व्यवस्थापन खूपच चांगले आहे. आज सकाळीदेखील चालण्याचा आनंद लुटला. सकाळी अंदमान वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला भेट दिली. या कॉम्प्लेक्सचे उदघाटन १५ ऑगस्ट १९९४ ला झाले आहे. प्रवेशद्वाराजवळ त्सुनामी स्मारक,कारगील स्मारक व अबरडीन युध्दस्मारक आहे.
              अबरडीन स्मारक ब्रिटिश राजवटीत अंदमानच्या लोकांनी १८५९ मध्ये घेतलेल्या युध्द सहभागाबद्धल तसेच शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्याप्रति  सदभावना व्यक्त करण्यासाठी बांधले आहे. येथील जेट्टीला अबरडीन जेट्टी असे नाव दिले आहे . येथे भारतरत्न राजीव गांधी यांचा पुतळा आहे.याठिकाणी वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. उदा. खोल समुद्रात जाऊन शंखशिंपले पाहणे,वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहणे.विविध प्रकारच्या पाण्यातील वनस्पती पाहणे. खडकांची रचना पाहणे.आम्ही नॉर्थ बेवर  ग्लास बोटीतून समुद्राच्या तळाशी असणाऱ्या वनस्पती, सागर तळावरील खडकांची रचना पहिली.
                   आम्ही रॉस आयलँड (नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप)वर गेलो.या बेटाचे  मुळ नाव"चोंग एकी बूड"  होते . नंतर ब्रिटिश अधिकारी सर डेनियल रॉस यांच्या नावाने हे बेट रॉस आयलँड  नावाने ओळखले जाऊ लागले.आता ते नेताजी सुभाषचंद्र बोस द्विप या नावाने ओळखले जाते.रॉस  आयलँडवर ब्रिटीश कालावधीत वापरात असलेल्या इमारतीचे अवशेष आहेत. उदा.सचिवालय, कमळे असलेले  पाण्याचा तलाव,अधिकारी निवासस्थान, पोहण्याचा तलाव, चर्च, हेलिपॅड, कमिशनर बंगला, दफन विधीची जागा, संग्राहलय, जपानी बंकर, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, प्रिंटींग प्रेसआदि. येथे ससे,हरणे मुक्तपणे संचार करीत होते.
                 या बेटावर इंग्रजानी तसेच जपानी लोकांनी राज्य केले होते.आजच्या भेटीतून इंग्रजी तसेच जपानी राजवट त्यांचा शेवट यासंबंधी माहिती मिळाली.आपण प्रत्येकाने आपला इतिहास जाणुन घ्यायला हवा .कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. आपला देश जगात नंबरवन होण्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने प्रयत्न करायला हवा असे मला वाटते.
   राजेंद्र पवार
९८५०७८११७८

आमची अंदमान निकोबार सहल दिवस पाचवा

!!आमची अंदमान निकोबार सहल !! (५  )



            
              आज आम्ही हॅवलॉक बेटावरील मुक्काम संपवुन पोर्टब्लेअरला जाण्यासाठी लवकरच तयार झालो. मला सकाळी चालण्याची सवय असल्याने तोही आनंद आज मी लुटला. आज आमचे जहाज सकाळी ९.३० ला सुटणार होते. सकाळी ९ वाजताच आम्हाला जेट्टीवर घेण्यात आले. सर्व तपासणीच्या प्रक्रिया पूर्ण करुनच आपल्याल्या प्रवेश मिळतो. हॅवलॉक ते पोर्टब्लेअर प्रवासासाठी "ग्रीन ओशन १"  या जहाजातून प्रवास केला. जहाजात देखील चित्रपटगृहांप्रमाणे रॉयल, लझरी, इकॉनॉमी असे क्लास असतात . आम्ही लझरी प्रवासाचा आनंद लुटला .प्रवासदरम्यान एक चित्रपटसुध्दा पहिला. हा प्रवास २.३० (दोन तास ,तीस मिनिटांचा )आहे.
             हा प्रवास करताना बराचवेळ आम्ही डेकवर उभे होतो. डेकवर उभे राहिल्याने सागराची विशालता पाहता आली. संपूर्ण अंदमान निकोबार बेटांचा विचार केला तर, याठिकाणी नैसर्गिक विविधता भरपूर आहे. येथे आपणास विविध प्रकारची फुलपाखरे पाहावयास मिळतात. दुगोंग हा या राज्याचा मुख्य प्राणी आहे. त्याला (सी-काऊ) असे देखील म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे जलचर प्राणी, वनस्पती, दलदलीत आढळणारे प्राणी दिसून येतात.
                हा परिसर भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने येथे मोठ्या इमारती फारश्या आढळत नाहीत.इमारती बांधताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा (लाकडाचा) वापर  केलेला दिसून येतो. काही ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झालेला पहावयास मिळतो. आज आम्ही संध्याकाळी बाजारपेठेतून फेरफटका मारला, खादी ग्रामोद्योग भवन, उद्योग परिसर,मिडल पॉईंट, पोर्ट ब्लेअर येथून काही खरेदी केली . मिडल पॉईंट  परिसरात  कलाकुसरीच्या अनेक वस्तु पाहण्यास मिळाल्या. बाजारपेठेत जाण्यासाठी सार्वजनिक बससेवेचा लाभ घेतला . चालक, वाहक खूपच सेवाभावी वाटले . हा परिसर  निसर्ग नियमांचे तंतोतंत पालन करणारा आहे हे तेथील सर्व बांधकाम रचनेवरून दिसून येते. आपल्या जीवनात आपणही निसर्ग नियमांचे पालन करावयास हवे हाच संदेश आपणास  मिळतो असे मला वाटते.
     राजेंद्र पवार
९८५०७८११७८

आमची अंदमान निकोबार सहल दिवस चवथा

!!आमची अंदमान निकोबार सहल !!  (४)   



            आज सकाळी लवकर उठून तयार झालो. बाहेर पूर्णपणे पावसाळी वातावरण होते. येथे जणुकाही पावसाळाच चालू आहे असे वाटत होते. रस्त्याचा दुतर्फा गालिचा अंथरल्यासारखे दिसत होते. 
          या बेटावर लाजाळू वनस्पती भरपुर प्रमाणावर दिसून आल्या. या बेटावर पर्यटकांचीच गर्दी अधिक  दिसत होती. पर्यटन हा येथील मुख्य व्यवसाय आहे , येथे रोजगारासाठी बाहेरच्या राज्यांतून अधिकतर लोक आलेले दिसुन येत होते. अंदमान निकोबार बेटावर एकही परराज्यातील वाहन आपण  पाहू शकत नाही. पर्यटनामुळे येथे हॉटेल व  टॅक्सी व्यवसाय जोरात चालत असल्याचे दिसून आले. स्वराज द्वीप (हॅवलॉक ) या बेटावर दुचाकी वाहनेदेखील भाड्याने मिळु शकतात . येथे वातावरणात अचानक बदल होऊ शकतो. वातावरण बदलाचा परिणाम आमच्या सहलीवरदेखील झाला.
             आम्ही आज एलिफंट बीचवर गेलो होतो तो संपूर्ण भाग वनविभागाच्या ताब्यात आहे. या बीचवर जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो. या बीचवर आपणास समुद्र स्नानाची चांगली संधी आहे. आम्ही मास्क लावून (snorkeling )पाण्यातील खडकांची रचना,वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे मासे पाहिले.निसर्गाची अदभुत किमया आम्हास अनुभवता आली.  पाण्यात देखील फोटो काढता येतात हे आम्ही प्रत्यक्ष पाहिले . तिथल्या फोटोग्राफरने आमचे फोटो काढले व ते लगेच मोबाईलमध्ये ट्रान्सफारसुद्धा करुन दिले. परत  जेट्टीच्या दिशेने येताना वेगवान वारे वाहत होते त्यामुळे डेकवर पाण्याचा वर्षाव होत होता. त्या वर्षावात चिंब होण्याचा आनंद घेतला.
          आज समुद्राचे निरीक्षण करताना वरवर नुसते निळे पाणी  दिसत होते परंतु प्रत्यक्षात मास्क घालुन पाण्यात तरंगताना त्यातील जलचर  तसेच अंतर्गत खडकांची,प्रवाळांची रचना प्रत्यक्ष पाहता आली.जीवनात देखील तसेच आहे.   मला वाटते आपणास एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी खोलवर जाऊन अभ्यास करावयास हवा तरच आपण उद्दीष्ट गाटू शकतो. (Snorkeling video) ची लिंक सोबत पाठवली आहे ती अवश्य पहा.
राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

आमची अंदमान निकोबार सहल दिवस तिसरा

!!   आमची अंदमान निकोबार सहल !!    (३ )           




           आज सकाळी लवकर  (स्वराज द्विप ) हॅवलॉक बेटावर जाण्यासाठी तयार झालो. हॉटेल सकाळी ७ वाजता सोडले. आमचे जहाज ८.३० ला सुटणार होते. सुरक्षा यंत्रणेच्या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ८ वाजेपर्यंतचा वेळ गेला. लगेचच आम्हाला जहाजात जाण्याची परवानगी मिळाली.  तेथील (सिलिंक) स्टाफच्या मदतीने आम्ही आमच्या जागेवर स्थानापन्न झालो. जहाजात किमान २०० प्रवासी असतील. आपण जणुकाही एखाद्या थिएटरमध्ये बसलो आहोत असे वाटले. समोर टी. व्ही. चालूच होता. निळ्याशार  समुद्रातून मार्गक्रमण चालु होते.
               वर्णन कसे करावे हेच समजत नाही इतके आम्ही भारावून गेलो होतो. आम्ही २.४५ (दोन तास पंचेचाळीस मिनिटांचे) च्या प्रवासानंतर ( स्वराज द्वीप ) हॅवलॉक बेटावर पोहोचलो. आमचा निवास पर्यावरणपूरक असणाऱ्या राधाकृष्ण रिसॉर्टमध्ये होता. हे रिसॉर्ट पूर्णपणे बांबूपासून तयार केलेले आहे.
               आज आमची मा.सदाभाऊ खोत राज्यमंत्री,कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता तथा सहपालकमंत्री सातारा जिल्हा यांचेशी भेट झाली. तेही कुटूंबियांसोबत सुट्टीसाठी अंदमान निकोबार बेटावर आले होते. त्यांचेबरोबर फोटोदेखील काढले.दुपारच्या भोजनानंतर आम्ही राधाकृष्ण बीचवर समुद्र स्नानासाठी गेलो. मीही इतरांचेबरोबर स्नानाचा आनंद लुटला . टाईम मॅगेझीनच्या वृत्तानुसार हा आशिया खंडातील सर्वोकृष्ट बीच आहे. हॅवलोक बेटावर सर्वत्र नारळ, सुपारीच्या बागा दिसल्या. बऱ्याच ठिकाणी घरासमोर सुपारीचे ढिगचढीग दिसत होते. आजचा मुक्काम येथेच आहे. या बेटावरील रस्ते चांगले आहेत. पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची पध्दत खूप आवडली. आपण आतिथीचे आदरातिथ्य कसे करावे हेच आजचा दिवस शिकवून गेला.
       राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

आमची अंदमान निकोबार सहल दिवस दुसरा



!!  आमची अंदमान निकोबार सहल !!           




              जारवा संरक्षित क्षेत्रात जाण्यासाठी आज  ५.४५ वाजताच हॉटेलवरून निघालो. या क्षेत्रात वनविभागाच्या आवश्यक त्या परवानग्या घेतल्याशिवाय प्रवेश करता येत नाही. अंदमान निकोबार बेटांचा परिसर घनदाट जंगलासाठी प्रसिध्द आहे. येथे पादुक वृक्ष हा राजवृक्ष आहे . या वृक्षांची उंची २५ ते ४० मीटर आहे तर झाडांचा घेर १.५ ते २ मीटर आहे.  येथील एक बेट (Parrot Island ) म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी पोपटांच्या विविध प्रजाती पहावयास मिळतात.
             अंदमान निकोबार बेटावर जारवा जमातीचे लोक आढळतात . त्यांना मनुष्य वस्तीचा कसलाही संपर्क नाही. आम्ही काही त्यांना पाहू शकलो नाही .येताना , जातानाचा विचार  केला तर आम्ही तीन तास जंगलातून प्रवास केला. येथील वनराई अतिशय घनदाट आहे. आम्ही चुनखडकातील गुहा पाहण्यासाठी गेलो. पावसाचे पाणी खडकात झिरपत असताना त्यातील क्षार पाण्यात विरघळतात त्यामुळे खडकांना वेगवेगळे आकार प्राप्त होतात.



              याठिकाणी कमळ फूल, गुलाब फुल,गणेश मूर्तीचे आकार प्राप्त झाल्याचे दिसून आले. या गुहांचा शोध प्रथम १९७२ साली लागला ,त्यावेळी समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झाली होती असे सांगितले जाते.या गुहा पाहण्यासाठी  बाराटांगला प्रथम जावे लागते .बाराटांगला जाण्यासाठी प्रथम मोठा जहाजातून तर  नंतर छोट्या बोटीतून जावे लागते.बोटीतून जाताना तुम्हाला लाईफ जॅकेट परिधान करावे लागते. आम्ही १८ कि. मी.चा जलप्रवास केला.संध्याकाळी ६ वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आज चुनखडकातील गुहा व घनदाट जंगल पाहून निसर्गाची किमया, भूगर्भातील खडक रचना पहावयास मिळाली.  निसर्ग अबाधीत राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे मला वाटते.

    राजेंद्र पवार
   ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...