शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

आमची अंदमान निकोबार सहल दिवस पहिला



    !!  आमची अंदमान निकोबार सहल दिवस पहिला  !! 




                   
             अंदमान निकोबार सहलीचे प्रस्थानासाठी साताराहून १५ तारखेस रात्री ११ वाजता निघालो .१६ तारखेच्या पहाटे २ वाजता पुणे विमानतळावर पोहोचलो. आमचा पहिलाच विमानप्रवास असल्याने  सर्वच  बाबी आमच्यासाठी नवीन होत्या.  आवश्यक त्या तपासणीनंतर  आम्हास बोर्डिंग पास प्राप्त झाले . प्रस्थान पहाटे ४.२० ला असल्याने आम्ही द्वार क्र.२ मधील विश्रांती कक्षात थांबलो.या सहलीत सातारा येथील सर्व ग्रुप आहे.ग्रुपलीडर आहेत निवृत्ती माळी. आमच्यासोबत सातारा येथील आमचेसह २२ जण आहेत. त्यामध्ये मालगावचे कदम सर सपत्निक आहेत.आम्ही दोघेही या सहलीसाठी आलो आहोत. पहाटे ४.३० ते ५.३० एवढ्या वेळातच पुणे  ते   हैदराबाद     प्रवास झाला.विमानातून उतरल्यावर विमान कंपनीच्या बसने  विमानतळावर पोहोचवण्यात आले. विमानतळावर खूप मोठे मार्केट दिसून आले.हैदराबाद विमानतळाचे "Rajiv Gandhi International Airport" असे नामकरण करण्यात आले आहे.
              आम्ही हैदराबादहून सकाळी ९.४५  ला निघालो आणि निर्धारित वेळेप्रमाणे बरोबर १२  वाजता वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ अंदमान येथे पोहोचलो.हॉटेलवर थोडीशी विश्रांती घेऊन सेल्युलर जेल पाहण्यासाठी गेलो.स्वातंत्र्यवीर सावरकराना ज्या कोठडीत ठेवले होते ती कोठडी पाहिली. देशातील क्रांतिकारकाना बंदीस्त करण्यासाठी ही जेल बांधली होती. येथे ७०० कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था केली होती . आंदोलकांना कोणत्या त्रासातून जावे लागत होते हे अनेक प्रतिकृतीच्या माध्यमातून येथे दाखविले आहे.
               स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास जाणून घेण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येथे भेट देत आहेत.सेल्युलर जेलच्या समोरच सावरकर पार्क आहे या पार्कमध्ये विनायक दामोदर सावरकर, इंद्र भूषण रॉय, बाबा भान सिंह, पंडित राम राखाबाली,महावीर सिंह, मोहन किशोर नामदास, मोहित मोईत्रा यांचे   साखळदंड  असलेले   पुतळे आहेत.संध्याकाळी उत्तम ध्वनीप्रकाश योजनेच्या माध्यमातून  स्वातंत्र्य आंदोलनाचा संपूर्ण इतिहास सांगितला जातो .सेल्युलर जेलचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात १९७९ मध्ये करण्यात आले आहे.त्याचे उदघाटन  तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते.

              याच परिसरात गेटच्या जवळ स्वतंत्रता ज्योत कायमस्वरूपी प्रज्वलीत असलेली दिसून आली.भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.  याची जाणीव ठेवून आपण आपल्या देशाचे नाव जगात उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे ते आपण सर्वजण पार पाडुया. देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकाप्रती कृतज्ञता  बाळगुया.
     राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...